राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर..

राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो...ऐवजी अशी

Updated: Jan 23, 2020, 10:13 PM IST
राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवानो,... अशी झाली नाही तर.. title=

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महाअधिवेशन गोरेगाव येथे सुरु  झाले. यावेळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे केली नाही. या भाषणात हिंदुत्वाची झालर दिसून आली. राज ठाकरे हे भाषणाच्या सुरुवातीला जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवानो, भगिणींनो आणि मातांनो, अशी सुरुवात करतात. मात्र, पक्षाच्या नवा ध्वज लॉन्च केल्यानंतर त्यांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिणींनो आणि मातांनो, अशी सुरुवात केली. सुरुवातीलाच त्यांनी हिंदूत्वाची कास धरल्याचे भाषणाच्या सुरुवातीलाच दाखवून दिले. पक्षाचा झेंडा आवडला का, असे विचारत संवाद साधण्यास सुरुवात केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अपेक्षेप्रमाणे प्रखर हिंदुत्त्ववादी भूमिका घेतली आहे. सीसीएला पाठिंबा जाहीर करतानाच बांग्लादेश, पाकिस्तानातून आलेल्या मुसलमानांना हाकला अशी मागणी करत ९ फेब्रुवारीला मोर्चा काढण्याची घोषणाही त्यांनी केली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच जमलेल्या हिंदू बांधवांनो अशी करून त्यांनी भाषणाची दिशा स्पष्ट केली होती. पक्षाचा झेंडा बदलल्याबाबत होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. राममंदिर, अनुच्छेद ३७० हटवल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे राज ठाकरे यांनी अभिनंदनही केले. त्याबरोबरच राज्याच्या काही भागात काही मौलवी शिरले असून काहीतरी मोठे कट-कारस्थान शिजत असल्याची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे, असं राज ठाकरे म्हणाले. देशाशी प्रामाणिक मुसलमान आमचेच आहेत, कलामांना नाकारू शकत नाही, झहीर खानला नाकारू शकत नाही, जावेद अख्तरांना नाकारु शकत नाही. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते. जर कोणी आडवा जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आडवाच घालणार, असे राज म्हणालेत. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसे शॅडो कॅबिनेट तयार करणार आहे. सरकारमधील महत्त्वाच्या प्रत्येक खात्यासाठी एका नेत्याची शॅडो मंत्री म्हणून नेमणूक केली जाईल. हे नेते आपापल्या खात्यातील कामं, मंत्र्यांची कार्यशैली, भ्रष्टाचार इत्यादीवर लक्ष ठेवण्याचं काम करतील. सरकार योग्य पद्धतीनं काम करतंय की नाही, यावर देखरेख करण्याचं काम ही टीम करेल. यामध्ये बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर, अविनाश जाधव, संतोष धुरी आदी नेत्यांचा समावेश असेल.