आदित्यची 'शॅडो' होणार अमित ठाकरे; सांभाळणार 'या' खात्याची जबाबदारी

पाहा काय असेल त्यांची भूमिका 

Updated: Mar 9, 2020, 08:32 PM IST
आदित्यची 'शॅडो' होणार अमित ठाकरे; सांभाळणार 'या' खात्याची जबाबदारी  title=
आदित्यची 'शॅडो' होणार अमित ठाकरे; सांभाळणार 'या' खात्याची जबाबदारी

नवी मुंबई : सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात महत्त्वाची घोषणा करण्यात आली. ही घोषणा होती मनसेच्या शॅडो कॅबिनेटची. नवी मुंबईत मनसे नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अमित ठाकरे यांच्यावरही काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. 

महाविकासआघाडी सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून घोषित करण्यात आलेल्या या शॅडो कॅबिनेटमध्ये मनसेमधील काही मोठ्या चेहऱ्यांनवरही महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्यामध्ये अमित ठाकरेंच्याही नावे काही खात्यांच्या कारभाराची पाहणी करण्यासाठीचं काम सोपवण्यात आलं. 

काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या मनसेच्या खास अधिवेशनात अमित ठाकरे यांनी अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा त्यांच्या हाती घेतला होता. या अधिवेशनात मनसेकडून त्यांना नेतेपदही देण्यात आलं. आपल्यावर सोपवण्यात आलेली हीच जबाबदारी सार्थ ठरवण्यासाठी म्हणून मग अमित ठाकरे यांनी त्या दिशेने पावलं उचलली. 

अमित ठाकरे यांच्या कार्याचा उंचावता आलेख पाहता आता शॅडो कॅबिनेटमध्ये त्यांच्या वाट्याला ग्रामविकास, नगरविकास, वने, मदत पुनर्वसन, नगरविकास आणि पर्यटन या विभागांची जबाबदारी सोपवली आहे. अर्थात यामध्ये त्यांना मनसेच्या इतर नेत्यांचीही साथ असेल. अमित ठाकरे यांच्या वाट्याला आलेल्या या खात्यांपैकी पर्यटन विभागाची त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी पाहता आता ते थेट कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या पर्यटन मंत्रीपदाच्या कारभाराचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध ठाकरे असं वातावरण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळणार आहे. 

पाहा असं असेल राज ठाकरेंचं शॅडो कॅबिनेट

मुख्य म्हणजे मनसेच्या शॅडो कॅबिनेटची आखणीच मुळात महाविकास आघाडीवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता नात्याने भाऊ असणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या कामगिरीची पाहणी करत अमित ठाकरे नेमके काय मुद्दे मांडणार याकडे अनेकांचं लक्ष असेल. शिवाय त्यांच्याकडे देण्याच आलेल्या इतरही विभागांसाठी ते कोणती पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.