मुंबई : मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ६ नगरसेवकांच्या गटाला मान्यता देणे तसेच संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविणे या मनसेनं केलेल्या मागण्यांवर आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.
कोकण विभागीय आयुक्तांपुढे ही सुनावणी होणार होती. नगरसेवकांचे पक्षांतर बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी मनसेने याचिका दाखल केलीय. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची याचिकेत मागणी करण्यात आलीय.
तसेच नगरसेवकांचे अधिकार गोठवण्याचीही मागणी याचिकेद्वारे मनसेनं केली. मात्र गेल्या सुनावणीत आयुक्तांनी याचिका दाखल केली, पण नगरसेवकपदाचे कायदेशीर अधिकार गोठवण्याची मनसेची मागणी फेटाळली होती. गेल्या महिन्यात मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. याप्रकरणी आर्थिक व्यवहार झाल्याचा मनसेचा आरोप आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक लाचलुचपत विभागाकडे केली आहे तक्रार. पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांच्या संपत्तीची चौकशीची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या या खेळीमुळे मुंबईतील राजकारण चांगलंच तापलं होतं. मनसे आणि शिवसेना यांच्यातील मतभेद अधिक ठळकपणे समोर आले होते. सहा नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे मनसेला चांगलाच धक्का बसला. कारण मनसेकडे केवळ एकच नगरसेवक शिल्लक राहिला. आता त्या सहा नगरसेवकांबाबत पुढील सुनावणी कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.