एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे सूरतला जाणार होते, पण...

आमदार संजय राठोड यांचा मोठा गौप्यस्फोट, मविआतून बाहेर पडण्याला संजय राऊत जबाबदार

Updated: Jul 6, 2022, 06:15 PM IST
एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे सूरतला जाणार होते, पण...  title=

Maharashtra Politics : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी चर्चेला तयार होते, त्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सुरतला जाणारही होते मात्र संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यात खोडा घातला असा गौप्यस्फोट आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी केला आहे. आपण शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंना समजावण्याचा प्रयत्न केला. ते तयार झाल्यावर राऊतांनी सगळं बिघडवलं असा आरोप राठोड यांनी केलाय. 

महाविकास आघाडीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडण्यामागे संजय राऊत हेच जबाबदार असल्याचा आरोपही संजय राठोड यांनी केला आहे. गुलाबराव पाटील, दादा भूसे आणि मी आम्ही तिघांनी शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांना समजवण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे तयारही झाले आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चेसाठी आदित्य ठाकरे यांना पाठवण्याचं ठरलं.

पण संजय राऊत हे एकनाथ शिंदेयांच्या फारच विरोधात होते. त्यांनीच उद्धव ठाकरे यांना सांगितलं, आदित्य ठाकरे यांना पाठवू नका, शेवटी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना पाठवण्यात आलं. मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक सूरतला चर्चेसाठी गेले आणि इकडे एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यामुळे वातावरण बिघडलं, या सर्वामागे संजय राऊत हेच होते असा आरोपही संजय राठोड यांनी केला आहे.