मुंबई: मीरारोडच्या एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी फॅमिली रेस्टाँरंट व बार मध्ये काम करणाऱ्या दोघांचे मृतदेह बारच्या पाण्याच्या टाकीत सापडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मीरा-भाईंदरमध्ये एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री साडेदहाच्या सुमारास बारमालकाने पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस घटनास्थळी गेले असता बारमधील पाण्याच्या टाकीत दोन कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी हे मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख पटवली.
प्रेमप्रकरणातून प्रियकराच्या भावाचा खून
रेश पंडित आणि हरेश शेट्टी अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोन्ही मृतांच्या डोके आणि इतर शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी मृतदेह टाकीतून बाहेर काढले तेव्हा ते प्रचंड कुजलेल्या अवस्थेत होते. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस सध्या संशयितांचा शोध घेत आहेत. त्यासाठी बारमालक आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशीही करण्यात आली. याशिवाय, पोलीस बार आणि आजुबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहेत.