मायकल जॅक्सनचा शो तब्बल 23 वर्षांनी पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत

मुंबईत 1996 साली मायकल जॅक्सनच्या शोचं आयोजन करणाऱ्या विझक्राफ्टला करमणूक करात मिळालेली सूट कायम रहावी, यासाठी

Updated: Jan 5, 2021, 06:46 PM IST
मायकल जॅक्सनचा शो तब्बल 23 वर्षांनी पुन्हा मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत 1996 साली मायकल जॅक्सनच्या शोचं आयोजन करणाऱ्या विझक्राफ्टला करमणूक करात मिळालेली सूट कायम रहावी, यासाठी उद्याच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैेठकीत प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे तब्बल 23 वर्षांनी हा विषय पुन्हा चर्चेला येत आहे. शिवसेना - भाजप युती सरकारच्या काळात 1996 साली मुंबईत मायकल जॅक्सनचा शो आयोजित करण्यात आला होता. 

विझक्राफ्ट या एजन्सीमार्फत या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेनेच्या शिवउद्योग सेनेसाठी निधी जमा करण्याच्या उद्देशाने या शो चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मायकल जॅक्सनाला क्लासिकल सिंगर असल्याचं दाखवत या शोसाठी 3 कोटी 34 लाख रुपयांचा करमणूक कर माफ करण्यात आला होता. 

मात्र याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयातील याचिकेमुळे विझक्राफ्टने 3 कोटी 34 लाखांचा करमणूक कर न्यायालयात जमा केला आहे. करमणूक कर माफ करण्याच्या युती सरकारच्या निर्णयावर न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. 

मात्र याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारलाच दिले होते. त्यानुसार विझक्राफ्टने ही रक्कम परत मिळावी यासाठी राज्य सरकारकडे अर्जही केला होता. आता उद्याच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या करमणूक कराची रक्कम विझक्राफ्टला परत देण्यासंदर्भात प्रस्ताव येणार असून त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.