म्हाडाच्या संक्रमण गाळ्यांमधील विद्युत मीटर भाडेकरूंच्या नावे होणार

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे किंवा इतर विभागीय मंडळातर्फे विक्रीसाठी सदनिका बांधल्या जातात.

Updated: Dec 2, 2019, 06:23 PM IST
म्हाडाच्या संक्रमण गाळ्यांमधील विद्युत मीटर भाडेकरूंच्या नावे होणार title=

मुंबई: म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांमधील विद्युत मीटर उपअभियंता किंवा मिळकत व्यवस्थापक यांच्या नावे न घेता संबंधीत पात्र गाळेधारकाच्या नावे घेण्यात यावे. तसेच सध्या मंडळाच्या नावे असणारी विद्युत मीटर तात्काळ संबंधीत पात्र भाडेकरूंच्या नावे करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचे  (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर यांनी परिपत्रकाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 
म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचे वितरण ताबा पत्र गाळेधारकाला मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी (संक्रमण शिबीर गाळे) यांच्या कार्यालयामार्फत केली जाते. संबंधीत गाळेधारकाच्या नावे विद्युत मीटर बसविण्यासाठी वा गाळेधारकाच्या नावावर करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देताना संबंधित गाळेधारकाच्या पात्रतेबाबतचे पुरावे चालू महिन्याच्या सेवा शुल्क भरल्याची ताबा पावती, वितरण आदेश, व्हेकेशन नोटीस व तत्सम बाबी यांची पडताळणी करण्यात यावी. तसेच मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी (संक्रमण शिबीर गाळे) यांच्या स्तरावर पात्र गाळेधारकास वीज मीटर बसविण्याबाबत किंवा त्यांचे नावे करणेबाबत ना-हरकत प्रमाण पत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. विभागीय मंडळात मुख्य अधिकारी यांनी ना-हरकत पत्र देण्याची कार्यवाही करावी, असेही निर्देश श्री. म्हैसकर यांनी दिले आहेत.         

म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे किंवा इतर विभागीय मंडळातर्फे विक्रीसाठी सदनिका बांधल्या जातात. सदनिकांमध्ये वीजेचे मीटर सध्याच्या पद्धतीप्रमाणे उप-अभियंता यांच्या नावे घेतले जातात. तथापि असे आढळून आले आहे की, लाभार्थींनी वीजेची बिले न भरल्यामुळे वीजेच्या देयकांची वसुली वीज मंडळ 'म्हाडा'कडून करते. सदरची पद्धत ही अयोग्य आहे. अशाप्रकारे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत बांधलेल्या पुनर्रचित इमारतींमध्ये किंवा संक्रमण शिबिरांमध्ये वीजेचे मीटर उपअभियंता यांच्या नावे घेतले जातात. यापुढे परिपत्रकातील आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी, असे आदेश श्री. म्हैसकर यांनी दिले आहेत.