मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्याना हे मिळणार सरकारी बंगले

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्याना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.  

Updated: Dec 2, 2019, 05:21 PM IST
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्याना हे मिळणार सरकारी बंगले title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे मंत्रिमंडळाचे काम सुरु झाले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील मंत्र्याना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले नव्हते. ते आता करण्यात आले आहे. तसेच राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सरकारी बंगला देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता 'वर्षा' हा बंगला सोडावा लागणार आहे. आता या बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी सरकार राज्यात स्थापन झाले. गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर ठाकरे सरकारने बहुमत चाचणीही जिंकली. तसेच विधानसभा अध्यक्ष पद निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची घोषणा केली. फडणवीस यांच्या नावाची  घोषणा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. आता ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना सरकारी बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे.

सत्ता स्थापन झाल्यावर अखेर आज सामान्य प्रशासन विभागाने या मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप केले आहे. कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला सरकारी निवासस्थान म्हणून मिळाणार आणि तिथे आधी कोण राहणार याची उत्सुकता होती. आता ती उत्सुकता संपली आहे. मागील पाच वर्षांपासून 'वर्षा' बंगल्यावर राहणारे देवेंद्र फडणवीस यांना हा सरकारी बंगला आता सोडावा लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'वर्षा' बंगला देण्यात आला आहे. हा बंगला दक्षिण मुंबईमधील मलबार हिल येथे आहे.

 महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सो. ना. बागुल यांनी राज्यापालांच्या नावाने हा बंगला वाटपाचा शासन निर्यण जाहीर केला आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल येथील 'सागर' बंगला देण्यात आला आहे. दरम्यान, 'वर्षा'नंतर दुसरा महत्वाचा बंगला म्हणजे 'रामटेक'. समुद्र किनारी असलेला रामटेक हा आलिशान सरकारी बंगला मिळवण्यासाठी काही नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते. याआधी एकनाथ खडसे या बंगल्यामध्ये राहायचे. मात्र ते हा बंगला सोडून गेल्यापासून येथे कोणताही नेता राहण्यास तयार नव्हता. १९९९ नंतर राज्यात पंधरा वर्षांनी सत्तांत्तर होऊन भाजपचे सरकार आले तेव्हा हा बंगला खडसेंना देण्यात आला होता. आता या बंगल्यात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ राहणार आहे. याआधी 'रामटेक' बंगल्यावर मंत्री असताना भुजबळ राहत होते.

'रॉयल स्टोन' हा बंगला शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांना देण्यात आहे. त्यामुळे राज्याच्या माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनाही त्यांचा 'रॉयल स्टोन' बंगला खाली करावा लागणार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना 'सेवासदन' हा बंगला देण्यात आला आहे. माजी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे हे सरकारी निवासस्थान होते. 'सेवासदन' हा मलबार हिल परिसरातील बंगला आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सो. ना. बागुल यांनी राज्यापालांच्या नावाने हा बंगला वाटपाचा शासन निर्यण जाहीर केला आहे.

<iframe allow="https://zeenews.india.com/marathi/video/shirol-ghalwad-farmers-taking-ca..." "="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560">