Mhada Lottery 2024: मुंबईत हक्काच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. लवकरच म्हाडा मुंबईत 2030 घरांसाठी सोडतीची जाहिरात काढणार आहे. 8 ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सोडत जाहीर होऊ शकते. परवडणाऱ्या दरात म्हाडाची घरे असल्याने अनेक जण या सोडतीसाठी इच्छुक असतात. आत्ताही म्हाडाने गोरेगाव, पवई, विक्रोळी या भागातील घरांचा समावेश सोडतीत केला आहे.
मुंबईत घराच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना घर घेणे महाग होऊन बसले आहे. त्यासाठीच म्हाडाकडून वेळोवेळी स्वस्त दरांत घरे उपलब्ध करुन दिली जातात. म्हाडाने मागील वर्षी 4 हजार घरांसाठी लॉटरी काढली होती. 4 हजार घरासंसाठी तब्बल लाखभर अर्ज आले होते. यंदाही म्हाडा मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. मात्र यंदा मध्यम गटासाठी सर्वाधिक घरे असणार असल्याचे कळतंय.
म्हाडाच्या यंदाच्या लॉटरीत अत्यल्प गटासाठी कमी घरे आहेत तर, मध्यम गटासाठी सर्वाधिक घरे आहेत. अत्यल्प गटासाठी 150च्या आसपास घरे आहेत. तर, उच्च गटासाठी अंदाजे 200 घरे व मध्यम गटासाठी 750 हून अधिक घरे तर अत्यल्प गटासाठी 600 हून अधिक घरे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हाडा एकूण 2030 घरांसाठी सोडत काढणार आहे.
मुंबई मंडळाकडून 8 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचे काम आता अंतिम टप्प्यात असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच अर्जविक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर ही सोडतीची तारीख असण्याची शक्यता आहे. त्यामुळं अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी फक्त एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे. कारण नंतर लगेचच अचारसंहिता लागत असल्याने त्याआधीच मुंबई मंडळाची लॉटरी जाहिर व्हावी, यासाठी राज्य सरकारही आग्रही आहे.
लॉटरीत अर्ज करण्यासाठी अर्जदारांकडे 7 कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. लॉटरीची तारीख जाहीर होण्यापूर्वी, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शपथपत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तयार ठेवून म्हाडाच्या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.
मुंबईबरोबरच आता कोकण मंडळासाठीही म्हाडाने लॉटरीची तयारी केल्याची माहिती समोर येतेय. कोकण मंडळाकडे आता 2 हजार घरे आहेत. मात्र आणखी घरांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळं 3 हजार घरांपर्यंतच्या घरांसाठी लॉटरी जाहिर होऊ शकते. यात 900 घरे पंतप्रधान आवास योजनेतील असून इतर घरे म्हाडा योजनेतील आहेत. तसंच, यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये विक्री न झालेल्या 4 हजारांहून अधिक घरांचा यामध्ये समावेश आहे.