Mumbai Crime News: आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळं एका हत्याचे पर्दाफाश करण्यास यश आलं आहे. दादर स्थानकातून कोकणात जाणाऱ्या तुतारी एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न दोन तरुणांकडून होत होता. मात्र त्यांच्याकडे असलेली मोठी सुटकेस त्यांना काही केल्या उचलता येत नव्हती. सुटकेस उचलता उचलता दोघांनाही घाम फुटला होता. तसंच, सुटकेसच्या चाकावर रक्ताचे थेंबही दिसून आले. दोन्ही तरुणांचे संशयास्पद वागणं पाहून आरपीएफ जवानाला संशय आला. त्यानंतर त्याने बॅग उघडून बघितली आणि धक्काच बसला. बॅगमध्ये एका तरुणाचा मृतदेह होता.
आरपीएफ जवानाने बॅग उघडून बघताच दोघा आरोपींपैकी एकाने तिथून पळ काढला तर दुसऱ्या पळ काढण्याच्या तयारीत असताना मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दोघे आरोपी मुकबधिर आणि अपंग आहेत. त्यांनीच पायधुनी येथे मित्र अर्शद खान याची हत्या करुन मृतदेह बॅगेत टाकला, असे समोर आले आहे. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते तुतारी एक्स्प्रेसमधून नेत होते. प्रवासात एखाद्या पुलावरुन ही बॅग ढकलण्याचा त्यांचा प्लान होता. मात्र आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळं हा प्लान फसला आहे.
दादर रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ११ येथे एक अनोळखी व्यक्ती सोमवारी सकाळी एक मोठी ट्रॉली बॅग घेऊन जात होता. गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोषकुमार यादव यांना त्याच्याव संशय आल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीला थांबवून त्याची बॅग तपासली असता त्यात रक्ताने माखलेला मृतदेह होता. तपासणी तो मृतदेह अर्शद अली सादीक अली शेख (३०) याचा असून तो सांताक्रुझ कलिना परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.
दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याप्रकरणी मृतदेह घेऊन जाणारा जय प्रवीण चावडा याला ताब्यात घेण्यात आले. तपासात शिवजीत कुमार सिंह याने त्याचा मित्र जय प्रवीण चावडा याच्या मदतीने केल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सिंह याची माहिती घेऊन त्याला उल्हासनगर येथून अटक केली. गुन्ह्यांत वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री क्षुल्लक कारणावरुन दोघांचा अर्शदसोबत वाद झाला. रागाच्या भरात दोघांनी हातोड्याने अर्शदवर वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी एका बॅगेत मृतदेह टाकला आणि तुतारी एक्स्प्रेसने जाऊन फेकण्याचा त्याचा प्लान होता.