भाजप नेत्यांसाठी वेड्यांची मोफत इस्पितळे सुरु करायला पाहिजेत- धनंजय मुंडे

पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Updated: Feb 6, 2019, 03:55 PM IST
भाजप नेत्यांसाठी वेड्यांची मोफत इस्पितळे सुरु करायला पाहिजेत- धनंजय मुंडे title=

मुंबई: भाजप नेत्यांचा सुरु असलेला वाचाळपणा पाहता त्यांच्यासाठी आता मोफत वेड्यांची रुग्णालये सुरु करायला पाहिजेत, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही टीका केली. काही दिवसांपूर्वी पूनम महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना 'शकुनी मामा' असे म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर केलेली ही टीका निषेधार्ह आहे. महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही. पवार साहेबांवर टीका करणारे राजकीयदृष्ट्या संपून गेले आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे धनंजय यांनी म्हटले. 

तत्पूर्वी शरद पवार यांचे नातू रोहित यांनीही पूनम महाजन यांच्यावरही सडकून टीका केली होती. त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख केला आहे. हे सगळे घडले तेव्हा पूनम महाजन डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या. आत्ता डोळ्यावर पट्टी बांधून महाभारत कोणी पाहीलं ते आपणच सांगू शकता, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. 

मुंबईत सीएम चषक युवा महासंगम या क्रीडा स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात पूनम महाजन यांनी महाआघाडीवर बोलताना शरद पवार यांचा उल्लेख 'महाभारतातील शकुनी मामा' आणि 'रामायणातील मंथरा' असा केला होता. पवारांवर केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पूनम महाजन यांच्यावर वैयक्तिक टीका करणारी पोस्टरबाजी मुंबईत केली आहे. अहो चिऊताई... महाभारत, रामायण यांचे कथानक राहू द्या, देश की जनता यह जानना चाहती  है, प्रविणने प्रमोद को क्यों मारा?, असा मजकूर या पोस्टर्सवर झळकत होता.