मुंबई : मध्य रेल्वेवर रविवारी २ डिसेंबर रोजी मस्जिद स्थानकातील जुना पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. रविवारी चारही मार्गांवर सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजता मेगाब्लॉक घेतला आहे.
मध्य रेल्वेवरील मस्जिद स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)कडील ३० वर्षांहून जुन्या पादचारी पुलावर हातोडा पडणार आहे. येथे नवीन पूल उभारण्यात येणार असल्याने रविवार ते १६ डिसेंबरमध्ये पाच तासांचे दोन ब्लॉक घेतले जाणार आहे. या कालावधीत या पादचारी पूलावरील तिकीट आरक्षण केंद्रही बंद ठेवले जाईल. हा मेगाब्लॉक एकूण चार मार्गिकांवर चालेल. त्यात दोन हार्बर मार्गांचा समावेश असून दोन अन्य मध्य रेल्वेवरील धीम्या मार्गांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने नवीन पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी सीएसएमटी ते भायखळ्यापर्यंत अप आणि डाउन अशा दोन्ही धीम्या लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे ठरवले. मस्जिद रेल्वे स्थानकाकडील हा जीर्ण अवस्थेतील पूल पाडण्यासाठी आणि नवीन पूल बांधण्यासाठी एकूण ४५ दिवसांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने मस्जिद स्थानकात रविवारी चारही मार्गांवर सकाळी १०.३० ते सायंकाळी ४.३० वाजता मेगाब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. त्यात गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल स. १०.१४ आणि भायखळ्यासाठी स. १०.२२ वा. सीएसएमटीहून पनवेलसाठी शेवटची लोकल स. १०.१० आणि वडाळ्यासाठी स. १०.२८ ची लोकल. भायखळ्याहून सीएसएमटीसाठी स. ९.५० वाजता शेवटची लोकल सुटेल. ही लोकल सीएसएमटीस स. ९.५९ वा. वडाळ्याहून स. ९.५२ वाजता शेवटची लोकल सुटून सीएसएमटी स. १०.१० वा. पोहोचेल.
सहा तासांच्या कालावधीत मस्जिद आणि सँडहर्स्ट रोडमध्ये एकही लोकल धावणार नाही. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा स्थानकापर्यंत एकही लोकल धावणार नाही. भायखळा आणि सीएसएमटीपर्यंत सर्व अप आणि डाउन लोकल जलद मार्गावर चालतील.वडाळा ते पनवेल, वडाळा ते वांद्रे/गोरेगावसाठी सुमारे १५ मिनिटांनी लोकल चालवण्यात येतील.
सीएसएमटी ते कल्याण/पनवेल मार्गावर रविवारी ब्लॉक घेतला जाणार नाही. पश्चिम रेल्वेवर रविवारी २ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने रविवारऐवजी शनिवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० पर्यंत वसई ते विरार स्थानकामध्ये धीम्या गतीच्या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत काही लोकल वसई ते विरारमध्ये जलद मार्गांवर चालतील. त्यामुळे लोकल सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.