मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये ज्या ठिकाणी कोरोना रूग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्याची घोषणा राज्याचे मदत आणि पुर्नविकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. शिवाय या घोषणेदरम्यान पहिल्या टप्प्यांतील जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न सोहळ्यांना 100 टक्के सूट देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश आहे.
एप्रिल महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना लग्नकार्यांमध्ये लोकांच्या उपस्थितीवर निर्बंध लावण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करत लग्नकार्यात केवळ 25 जणांना परवानगी असल्याची घोषणा केली होती. तर आता पहिल्या टप्प्यांतील जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या लग्नकार्यांमध्ये नातेवाईकांसाठी 100 टक्के सूट देण्यात आली आहे. तर इतर टप्प्यामध्ये असलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये लग्नकार्यामध्ये जास्तीत जास्त 200 जणांना परवानगी देण्यात आलेली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 18 जिल्हे अनलॉक करण्यात आले आहेत. यामध्ये धुळे, जळगाव, नाशिक, बुलडाणा, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये चित्रपटगृह, जिम, दुकानं, मॉल्स, मॉर्निंग वॉकला परवानगी देण्यात आली आहे. तसेच कार्यालयांना 100 टक्के उपस्थितने सुरु करण्यास मुभा दिली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई नगर, मुंबई उपनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे.
तिसऱ्या टप्प्यात एकूण 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. यात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, अकोला, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे. चौथ्या टप्प्यात केवळ 2 जिल्हे आहेत. यात रायगड आणि पुण्याचा समावेश आहे.