दीपक भातुसे, मुंबई : पहिली ते नववी आणि अकरावीच्या गुणपत्रिका देण्याच्या सर्व शाळांना सूचना सरकारकडून देण्यात येणार आहे. शिक्षण विभाग लवकरच याबाबत सूचना जारी करणार आहे. लॉकडाऊनमुळे पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षाच झालेली नाही. मात्र या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील परीक्षांचे मूल्यमापन करून गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे शाळांनी या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार कराव्यात आणि त्या ऑनलाईन वितरित कराव्यात अशा सूचना लवकरच शाळांना दिल्या जाणार आहेत. या गुणपत्रिकांवरुन पुढच्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागांच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत या बाबत निर्णय घेण्यात आला आहे.
देशाल कोरोनाचं संकट वाढत असताना त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे परीक्षा होऊ शकलेल्या नाही. आता परीक्षेची वेळही निघून गेली आहे. त्यामुळे परीक्षा घेता येणं शक्य नाही. त्यामुळे सरकार मागील परीक्षांच्या गुणांवरुन विद्यार्थ्यांना गुण देऊन पुढच्या वर्गात पाठवण्याचा विचार करत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान ही होणार नाही.
कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या दुसर्या सेमिस्टर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच दहावीचा एक राहिलेला पेपर ही रद्द करण्यात आला होता.