अभिनेता इरफान खानचा एनएसडी ते हॉलिवूडपर्यंतचा लक्षवेधी प्रवास

इरफानच्या आयुष्यातील १० महत्वाचे टप्पे

Updated: Apr 29, 2020, 02:12 PM IST
अभिनेता इरफान खानचा एनएसडी ते हॉलिवूडपर्यंतचा लक्षवेधी प्रवास title=

ब्युरो रिपोर्ट :  फिल्म इंडस्ट्रीमधील काही मोजक्या अभिनेत्यांमध्ये ज्याची गणना केली जाते अशा इरफान खान (Irrfan Khan) याचं निधन झालं. केवळ सिनेसृष्टीलाच नव्हे तर देशभरातल्या सिनेप्रेमींनाही हा एक धक्का आहे. आजाराशी लढा देऊन अखेर लढवय्या इरफान गेला. यावेळी मृत्युशी झुंज अपयशी ठरली.

‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या इरफान खानने बॉलीवूड बरोबरच हॉलिवूडच्या चित्रपटांतही आपला ठसा उमटवला. अगदी छोट्या भूमिकेतही स्वतःच्या अभिनायाची झलक दाखवणाऱ्या इरफान खानने त्याच्या कारकिर्दीत नाटकापासून ते टीव्हीपर्यंत आणि पुढे सिनेमात बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंतचा प्रवास केला. जाणून घेऊयात इरफान खानच्या आयुष्यातील काही खास पैलू.

  1. इरफान खानचा जन्म 7 जानेवारी  1967 रोजी राजस्थानमधील जयपूरमध्ये झाला. त्याच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. जन्माच्या वेळी त्याचे नाव साहबजादे इरफान अली खान असे होते.
  2. इरफान एमएचं शिक्षण घेत असताना दिल्लीतल्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ मध्ये शिक्षण घेण्यासाठी त्याला स्कॉलरशिप मिळाली. इरफान खानने एनएसडीमधून 1984 साली अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, म्हणजे अभियनाची पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला.
  3. एनएसडीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर इरफानने दिल्लीत नाटकात काम करण्यास सुरुवात केली आणि तिथे चांगलं नावही कमावलं.
  4. त्यानंतर इरफानने दिल्लीतून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतर चाणक्य, भारत एक खोज, सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता आणि श्रीकांत अशा मालिकांमध्ये काम केलं.
  5. नाटक आणि टिव्ही सिरियलमध्ये काम करून इरफान आपली ओळख निर्माण करत असताना चित्रपट निर्माती मीरा नायर हिने त्यांच्या सलाम बॉम्बे या चित्रपटात एक काम दिलं, पण चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याची भूमिका असलेला भाग कापण्यात आला होता.
  6. त्यानंतर 1990 मध्ये इरफानने ‘एक डॉक्टर की मौत’ या सिनेमात काम केलं. या चित्रपटातल्या त्याच्या भूमिकेचं समीक्षकांनी खूप कौतुक केलं. त्यानंतर इरफानने द ‘वॉरियर’ आणि ‘मकबूल’ अशा चित्रपटांत महत्वाच्या भूमिका साकारल्या.
  7. इरफान खानने 2005 मध्ये रोग या चित्रपटात प्रथमच प्रमुख भूमिका केली. त्यानंतर चित्रपट हासिलमधील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं.
  8. इरफान खानने स्लमडॉग मिलिनिअर फिल्मसाठी पोलीस इन्स्पेक्टरची महत्वपूर्ण भूमिका निभावली. त्या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यानंतर इरफानला हॉलिवूडचे दरवाजे खुले झाले आणि तिथे इरफानने तीन चित्रपटांत काम केले.
  9. इरफान खानला ‘पान सिंह तोमर’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. त्याबरोबरच त्याला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारानेही गौरवण्यात आलं.
  10. इरफान खानने एनएसडीमधूनच पदवी घेतलेल्या सुतपा सिकंदर हिच्याशी 23 फेब्रुवारी 1995 रोजी विवाह केला. त्याला बाबिल आणि अयान असे दोन पुत्र आहेत.

 

आपल्या अभिनायाने प्रेक्षकांच्या ह्रदयात स्थान मिळवलेला इरफान आजाराशी झुंज देऊन अकाली गेला, चाहत्यांच्या मनाला चटका लावून.