मराठा क्रांती ठोक मोर्चाची निवडणुकीतून माघार, या पक्षाला देणार पाठिंबा

मराठा क्रांती ठोक मोर्चाने आआपला निर्णय बदलायचं ठरवलं.

Updated: Aug 30, 2019, 03:15 PM IST
मराठा क्रांती ठोक मोर्चाची निवडणुकीतून माघार, या पक्षाला देणार पाठिंबा title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाने आता आपला निर्णय बदलायचं ठरवलं आहे. निवडणूक न लढवता मराठा क्रांती ठोक मोर्चा लवकरच भाजपला आगामी निवडणुकीत पाठिंबा जाहीर करणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांच्यासह ठोक मोर्चातील प्रतिनिधी आणि शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांची मुंबईत आज एक बैठक पार पडली. पुढील राजकीय भूमिका ठरवण्यासाठी ही बैठक होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला जेवढा न्याय दिला, तेवढा कुठल्याच सरकारने दिलेला नाही. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाने निवडणूक न लढवता भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पाठिंबा द्यावा अशी विनंती मेटे यांनी मोर्चाच्या प्रतिनिधींना केली. मराठा आरक्षणासह, मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतीगृह असे अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतले आहेत. तर काही जाहीर केलेल्या निर्णयांची अंमलबजावणी बाकी आहे. या निर्णयांची अंमलबजावणी व्हायची असेल तर पुन्हा भाजपाचे सरकार सत्तेवर यायला हवे. यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने भाजपाला पाठिंबा द्यावा अशी विनंती या बैठकीत मेटे यांनी केली.

विनायक मेटेंच्या विनंतीबाबत मराठा क्रांती ठोक मोर्चा सकारात्मक असल्याचं आबासाहेब पाटील यांनी सांगितलं. मराठा समाजाला न्याय देतील त्यांच्या मागे आम्ही उभे राहू, याबाबत अधिकृत भूमिका आपण लवकरच जाहीर करू असंही आबासाहेब पाटील यांनी या बैठकीनंतर बोलताना सांगितलं.