आजपासून देशभरात अनेक नियमांत बदल

जाणून घ्या, १ मार्चपासून 'या' नियमांत बदल

Updated: Mar 1, 2020, 08:24 AM IST
आजपासून देशभरात अनेक नियमांत बदल  title=
फाईल फोटो

मुंबई : आजपासून अनेक नियमांत बदल करण्यात आला आहे. ज्यांचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. स्टेट बँकेच्या ज्या खातेदारांचं केवायसी झालं नसेल त्या खातेदारांना आजपासून खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. एसबीआय ग्राहकांना याबाबत एसएमएसही पाठवण्यात आला आहे. ग्राहकांसाठी केवायसी पूर्ण करण्याची तारीख २८ फेब्रुवारी होती. २८ फेब्रुवारीपर्यंत केवायसी पूर्ण केलं नसल्यास अकाऊंट बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आरबीआयने एटीएम कार्डबाबत नवा नियम जाहीर केला आहे. एटीएम कार्डमधून पैसे काढण्याबाबत सूचना केल्या आहेत. आरबीआयने बँकांना एटीएममध्ये केवळ डोमॅस्टिक कार्ड वापरण्यास सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी स्वतंत्र मान्यता घ्यावी लागेल, असं आरबीआयकडून सांगण्यात आलं होतं.

आजपासून एटीएममधून खातेदारांना दोन हजारांच्या नोटा मिळणार नाहीत. दोन हजारांच्या नोटांसाठी खातेदारांना थेट बँकेत जावं लागणार आहे. एटीएममध्ये २०००च्या नोटा ठेवणाऱ्या कॅसेट बंद करण्यात येणार आहेत. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना २०००ची नोट बाजारात चालवण्यासाठी समस्या येत होती. २००० नोटेच्या बदल्यात सुट्टे पैसे मिळण्यास समस्या होत असल्याने हा बदल केल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे. 

तसंच आजपासून मोफत फास्ट टॅग सुविधाही बंद करण्यात आली आहे. त्यासाठी ग्राहकांना आता पैसे मोजावे लागणार आहेत. 

तर नव्या नियमानूसार आता लॉटरीवरही जीएसटी आकारला जाणार आहे. लॉटरीवर तब्बल २८ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.