वाझेशी संबंधित अनेक हँडलर सरकारमध्ये, आणखी नावे उघडकीस येतील - फडणवीस

 देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका 

Updated: Apr 5, 2021, 04:53 PM IST
वाझेशी संबंधित अनेक हँडलर सरकारमध्ये, आणखी नावे उघडकीस येतील - फडणवीस title=

मुंबई : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. उच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir singh)  यांनी केलेल्या आरोपावर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'गृहमंत्री यांनी राजीनामा दिला हे अपेक्षितच होते, मात्र हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला आहे. एवढे गंभीर आरोप असतांना, रश्मी शुक्ला यांचा रिपोर्ट बाहेर आला असतांना राजीनामा घेतला गेला. पण मला एक कोडं पडलेलं आहे की एवढया गंभीर गोष्टी होत असतांना मुख्यमंत्री हे एक चकार शब्द बोललेले नाहीत.'

फडणवीस यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी, 'वाझे काय लादेन आहे का?' ही एकच शेवटची प्रतिक्रिया दिलेली मला आठवते. अनिल देशमुख यांच्या राजीनामा पत्रात नैतिकतेच्या उल्लेखाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, 'नैतिकता ही पहिल्याच दिवशी आठवायला पाहिजे होती.'

'समाधान याचं आहे की आधीपासून जे पुरव्यासह मांडत होतो त्याबाबत न्यायालयाने निर्णय दिला आहे. आणखी अनेक नावे उघडकीस येतील. तपास होऊ द्या, आणखी नावे पुढे येतील. वाझेशी संबंधित अनेक हँडलर अजूनही सरकारमध्ये आहेत.' असा गंभीर आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे.

संजय राऊतांच्या प्रतिक्रियेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी अवस्था संजय राऊत (Sanjay Raut) यांची झाली आहे, ज्या गोष्टींचा बचाव करता येत नाही तेव्हा मग मी सरकारमधील नाही, वाचलं नाही अशा प्रतिक्रिया देतात.'