निवडणुकीसाठीच्या मुलाखतींना काँग्रेसच्या बड्या नेत्यांची दांडी

काँग्रेसचे विद्यमान आमदारही निवडणूक लढण्यास इच्छूक नाहीत.

Updated: Aug 1, 2019, 12:51 PM IST
निवडणुकीसाठीच्या मुलाखतींना काँग्रेसच्या बड्या नेत्यांची दांडी title=

मुंबई: काँग्रेसमधील नेते विधानसभा निवडणुकीसाठी उदासीन असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखत प्रक्रियेकडे अनेक बड्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. या सर्वांनी मुलाखतीला हजर न राहण्यासाठी वेगवेगळी कारणे दिली आहेत. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार यापैकी बहुतांश नेते काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी इच्छूक नाहीत.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी मुंबईत काँग्रेसपुढे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. तसेच मुलाखतींना दांडी मारलेले विद्यमान आमदार विरोधी पक्षांच्या गोटात जाणार की काय, अशी शंकाही काँग्रेसला सतावत आहे.

बेहिशेबी संपत्तीप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या कृपाशंकर सिंह यांनी कलिना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत अर्जही केला नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 

तर मालाडचे विद्यमान आमदार अस्लम शेख शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू असतानाच शेख यांनीही मुलाखतीकडे पाठ फिरवली. आमदार वर्षा गायकवाड, अमिन पटेलही मुलाखतीसाठी गेले नसल्याची माहिती आहे. 

या धक्कादायक घटनेनंतर विद्यमान आमदारांना मुलाखतीसाठी येण्याची गरज नसल्याची सारवासारव काँग्रेसने केली आहे. मात्र सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे यांनी मुलाखतीला हजेरी लावली होती. त्यामुळे काँग्रेसकडून खरी परिस्थिती लपवली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बडे नेते विरोधी गोटात दाखल झाले आहेत. मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये जात असल्याचे कारण प्रत्येकजण देत असला तरी यामागे चौकशीची ससेमिरा कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता.