वांद्रे वरळी सी लिंकवरील घटना अपघात नसून हत्येचा कट? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Bandra Worli Sea Link Accident : वांद्रे वरळी सी लिंकवर गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून नऊजण जखमी झाले आहेत. वेगात असलेल्या कारने सहा गाड्यांना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 10, 2023, 08:12 AM IST
वांद्रे वरळी सी लिंकवरील घटना अपघात नसून हत्येचा कट? भाजप नेत्याचा खळबळजनक दावा title=

Mumbai News : मुंबईत (Mumbai) गुरुवारी रात्री वांद्रे वरळी सी लिंकवरील (bandra worli sea link) टोल प्लाझावर झालेल्या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भरधाव कारने तब्बल सहा गाड्यांना धडक दिल्यामुळे हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर नऊजण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर टोल प्लाझावार एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी (Mumbai police) घटनास्थळी धाव घेऊन कारचालकाला ताब्यात घेतलं असून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. दुसरीकडे आपल्याला मारण्यासाठी हा अपघात घडवल्याचा दावा एका भाजपा नेत्याने केला आहे.

सी लिंकवरील टोल प्लाझाच्या अवघ्या 100 मीटर आधी हा अपघात झाला. वांद्र्याच्या दिशेने जात असलेली कार दुसऱ्या वाहनाला धडकल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीच्या धडकेनंतर कारचा वेग वाढला आणि तिने टोलनाक्यावरील आणखी वाहनांना धडक दिली. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे मुंबई भाजपाचे महामंत्री जितेंद्र हक्काराम चौधरी यांनी हा आपल्याला मारण्यासाठीचा प्रयत्न होता असा दावा केला आहे.  

वांद्रे-वरळी सी लिंक टोल प्लाझा अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या जितेंद्र हक्काराम चौधरी यांनी याबाबत माहिती दिली. जितेंद्र यांनी सांगितले की ते मुंबईतील भाजपाचे नेते आहेत. ही घटना आपल्या हत्येचा कट असल्याचे त्यांनी सांगितले. एका कार्यक्रमातून परतत असताना या कारने त्यांच्या कारला मागून धडक दिली. मी ज्या बाजूला बसलो होता त्याच बाजूने गाडीने धडक दिली. आपली कार समुद्रात जाण्यापासून वाचली, असाही दावा जितेंद्र यांनी केला आहे.

जितेंद्र यांनी सांगितले की, त्यांच्या कारला धडक दिल्यानंतर कार वेगाने टोल प्लाझाच्या दिशेने आली. टोलनाक्यावर वाहने उभी असतील याची त्याला कल्पना नव्हती. त्याने त्या वाहनांना जोरात धडक दिली. अपघात घडवणारा कार चालक वेगळ्या भाषेत बोलत होता आणि त्याने मद्यपान देखील केले नव्हते, असेही जितेंद्र हक्काराम चौधरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर कारचा चालकही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. चालकाची गाडीही जप्त करण्यात आली आहे.