महायुती मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रातही राबवणार? मुख्यमंत्रीपदाबाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीय. महायुतीनं यावेळी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देणं टाळलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढत असले तरी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार महायुतीनं दिलेला नाही. महायुती महाराष्ट्रातही मध्य प्रदेश पॅटर्न राबवणार का याची उत्सुकता लागलीय.

राजीव कासले | Updated: Oct 19, 2024, 07:46 PM IST
महायुती मध्यप्रदेश पॅटर्न महाराष्ट्रातही राबवणार? मुख्यमंत्रीपदाबाबत घेतला मोठा निर्णय title=

उर्वशी खोना, झी मीडिया, दिल्ली : महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीनं (Mahayuti) कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा (Chief Minister) चेहरा म्हणून जाहीर केलंल नाही. येत्या काळात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार महायुतीकडून जाहीर केला जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय. महायुतीचा मुख्यमंत्री विधानसभा निवडणूक निकालानंतरच घोषित करण्याची रणनिती भाजपश्रेष्ठींची आहे. दिल्लीतल्या बैठकीत अमित शाहांनी शिंदे-फडणवीस आणि अजितदादांना याबाबत माहिती दिल्याचं सांगण्यात येतंय.

मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीतही भाजपनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार दिला नव्हता. महाराष्ट्रातही तोच फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीच्या या रणनितीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चिमटे घ्यायला सुरुवात केलीय. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्यास महायुती घाबरलीय. महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल असं नाना पटोले सांगण्यास विसरले नाहीत.

महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. पण निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढत असल्याचं यापूर्वी भाजप नेत्यांनी जाहीर केलं होतं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याची आशा असली तरी फडणवीस, अजित पवार यांचा जीव मात्र टांगणीला लागला असेल हे तेवढंच खरं.

मुंबईत भाजप मोठा भाऊ?
महायुतीचं मुंबईतील 36 जागाचं ठरलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईतील विधानसभेच्या 18 जागा भाजप लढणार आहे. तर शिंदेंची शिवसेना 16 जागांवर निवडणूक लढणार आहे तर राष्ट्रवादीच्या वाट्याला मुंबईतील विधानसभेच्या 2 जागा आल्यात.. 

महायुतीचं जागावाटप ठरलं
दरम्यान, महायुतीचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती सूत्रांनी झी 24 तासला दिलीय.  दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत विधानसभेचं जागावाटप फायनल झाल्याची माहिती आहे. दिल्लीत अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची रात्री उशीरा बैठक झालीय..