सरकारचा हा प्रस्ताव अमान्य, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच

काल सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत एकून चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्या तरी एसटी कामगार संघटनांच्या संपाबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी संप सुरुच आहे.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 19, 2017, 08:50 AM IST
सरकारचा हा प्रस्ताव अमान्य, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच title=

मुंबई  :  काल सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १ वाजेपर्यंत एकून चर्चेच्या १३ फेऱ्या झाल्या तरी एसटी कामगार संघटनांच्या संपाबाबत तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी संप सुरुच आहे. दरम्यान, जोपर्यंत संप मागे घेत नाही तोपर्यंत आता पुढील बोलणी होणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावेत यांनी दिलाय. 

दरम्यान, ४ हजार ते ७ हजार रुपये पगार वाढ देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. हा प्रस्ताव एसटी कामगार संघटनेपुढे ठेवण्यात आला. मात्र, सातव्या वेतन आयोगावर एसटी कर्मचारी ठाम असल्याने संपाबाबत तोडगा निघू शकलेला नाही. तर जेवढी जास्तीत जास्त वेतनवाढ करणे शक्य आहे. ती ऑफर एसटी कामगार संघटनेला देण्यात आली. मात्र, संघटना प्रतिनिधींचे समाधान झालेले नाही. त्यामुळे हा संप जर मागे घेतला नाही तर उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते, असा गंभीर इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलाय.

मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यातली शेवटची बैठक रात्री १ वाजता संपली. बैठकीत तोडगा निघाला नाही,संप सुरुच राहणार असल्याची माहिती, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.बैठकीत आम्ही सातवा वेतन आणि सेवा ज्येष्ठतेची मागणी केली होती. यासाठी साडे चार हजार कोटींची मागणी प्रशासनाकडे केली होती. यात सातव्या वेतनाला मिळता जुळता प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. यामध्ये ४ ते ७ हजारांची वेतन वाढीचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आला. मात्र, त्यातली वाढ कामगारांना मान्य होणार नसल्याने अद्याप  तोडगा निघू शकलेला नाही, असे संदीप शिंदे यांनी सांगितले. 

जास्तीत जास्त वाढ देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये २.५७ हजार कोटींचा प्रस्ताव  समोर ठेवला आहे. यापुढे एक रुपया सुद्धा वाढून सरकारकडून दिला जाणार नाही. त्यामुळे एटी कर्मचारी संघटना का अडून बसले हे माहीत नाही. यात यापुढे कोणताही तोडगा निघणार नसून संप मागे घ्यावा असे दिवाकर रावते म्हणालेत.