ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार? काय म्हणाले अनिल परब

विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील एसटी कामगारांचा संप सुरु आहे

Updated: Dec 17, 2021, 02:42 PM IST
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार? काय म्हणाले अनिल परब title=

ST Bus Strike : विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून राज्यातील एसटी कामगारांचा संप सुरु आहे. राज्य सरकारकडून कामगारांना कामावर हजर होण्याचं आवाहन केलं जात आहे. पण एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.

दरम्यान, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा (MESMA) लावण्याबाबत आज होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. सरकारने शक्यतेपेक्षा जास्त पगारवाढ दिली आहे. पण काही कामगार भरकटलेले आणि दिशाहीन झाले आहेत. कामगारांमध्ये अफवांचं पीक आल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

आजच्या बैठकीत मेस्मा कुणावर आणि कसा लावायचा याचा निर्णय घेतला जाईल असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

आतापर्यंत २२ हजार कर्मचारी कामावर हजर झाल्याचं सांगत अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कामावर हजर व्हावं असं पुन्हा आवाहन केलं. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात एसटी वाहतूक बऱ्यापैकी सुरु झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र वाहतूक कमी आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. 

कामावर न परतलेल्या आतापर्यंत १० हजार कर्मचाऱ्याचं निलंबन झालं आहे, तर अडीच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. 

विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयात आहे, न्यायालयाने नेमलेली समिती आपला अहवाल देईल. पण २० डिसेंबरला एसटीचं विलीनकरण होईल असं सांगितलं जा आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, मात्र यात कर्मचाऱ्यांचंच नुकसान होत आहे असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.