शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण गेलं... पुढं काय? ठाकरे गटाचे आमदार कुणाचा व्हीप पाळणार?

उद्धव ठाकरे गटावरील संकटांची मालिका अजूनही संपलेली नाही, ठाकरे गटाची आणखी कोंडी करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आणखी एक रणनीती आखलीय

Updated: Feb 20, 2023, 08:31 PM IST
शिवसेना नाव गेलं, धनुष्यबाण गेलं... पुढं काय? ठाकरे गटाचे आमदार कुणाचा व्हीप पाळणार? title=

Maharashtra Politics : आगामी बजेट अधिवेशनात (Budget Session)  ठाकरे गटाची (Thackeray Group) कसोटी पणाला लागणाराय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशामुळं आधीच ठाकरे गटाचे धाबे दणाणलेत. आता ठाकरे गटाची आणखी कोंडी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेनं (Shivsena) नवी रणनीती आखलीय. त्यानुसार बजेट अधिवेशनासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हीप (Whip) जारी केला जाणाराय. ठाकरे गटाच्या आमदारांनाही हा व्हीप लागू असेल, असा दावा शिंदे गटानं (Shinde Group) केलाय. एवढंच नव्हे तर व्हीप झुगारल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिलाय.

पक्षाने बजावलेला व्हिप सर्वांना लागू होतो, कारण पक्षाच्या अधिपत्याखाली व्हिप बजावला जातो आणि सर्व आमदारांना तो स्विकारावा लागतो, असं शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी सांगितलं आहे. व्हिप स्विकारला नाही तर नियमानुसार जी कारवाई करायची आहे ती करु असा इशाराही भरत गोगावले यांनी दिला आहे. 

तर शिंदे गटाचा हा इशारा उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) धुडकावून लावलाय.. शिंदे गटाचा व्हीप आमदारांना लागू होणार नाही, असा त्यांचा दावा आहे. आमचं नाव आणि चिन्ह थोड्या दिवसांसाठी असलं तरी ते वेगळं आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह त्यांना दिलंय याचा अर्थ असा नाही त्यांचा व्हिप आम्हाला लागू होतो,  असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आम्ही आहोत तिथेच आहोत, ते घराच्याबाहेर गेलेत, त्यामुळे अपात्र होण्याची शक्यता त्यांची जास्त आहे, आम्हाला कोणताही धोका नाही असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

कायदेतज्ज्ञांनी देखील उद्धव ठाकरेंच्या बाजूनंच मत व्यक्त केलंय. शिंदे गटाचे आमदार जर बाहेर पडलेत असं सिद्ध झालं तर त्यांचा वेगळा गट होतो, त्यामुळे ठाकरे गटाचा व्हिप शिंदे गटाला लागू होणार नाही, आणि शिंदे गटाचा व्हिप ठाकरे गटाला लागू होणार नाही असं मत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी मांडलंय. 

आधीच शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. शिवाय शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.. शिंदे आणि ठाकरे गटातली कायदेशीर लढाई सुरू असताना, आता ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलंय...