मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; म्हणाले, लवकरच ठाणेकरांच्या राजकीय...

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिल्यांचा उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. 50 खोक्यांच्या घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले

Updated: Jan 26, 2023, 02:31 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; म्हणाले, लवकरच ठाणेकरांच्या राजकीय... title=

Maharashtra Politics : शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत राज्यात सत्तांतर घडवून आणत एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ठाणे (Thane) जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठे समर्थन मिळाले. मात्र काही शिवसैनिकांनी अद्यापही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पहिल्यांदाच ठाण्यात दाखल झाले आहे. यावेळी त्यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे.

"आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलोय आणि उद्या ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे. सध्या जो काही विकृत आणि गलिच्छपणा राजकारणामध्ये आलेला आहे तो समोर दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इथे आहेत. बाकी जे बिकाऊ आहेत कोणत्या भावाने विकले गेले हे तुम्हाला माहिती आहेत. काश्मीरमध्येही 50 खोकेच्या घोषणा दिल्या जात आहेत. पण यामुळे महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी झालीय," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. यासोबत 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण हे आपलं ब्रीद आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत, असे म्हणत शिंदे गटात गेलेल्या शिवसैनिकांवर टीका केली.

दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्ताने 26 जानेवारी रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यातील जांभळीनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते.

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातल्या टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही आहेत.