2024 मधील महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह, शरद पवारांच्या विधानानं पुन्हा संभ्रम

Sharad Pawar: मविआच्या जागावाटपाबाबत शरद पवारांनी एक विधान केलं. या विधानानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. 2024 मध्ये महाविकास आघाडी टिकणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. 

Updated: Apr 25, 2023, 10:52 AM IST
2024 मधील महाविकास आघाडीवर प्रश्नचिन्ह, शरद पवारांच्या विधानानं पुन्हा संभ्रम title=

Sharad Pawar on MVA: महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांकडे (Sharad Pawar) पाहिलं जातं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यामागेही पवारच. मात्र महाविकास आघाडीबद्दल (Mahavikas Aghadi) शरद पवारांच्या एका विधानानं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. जागावाटप अजून निश्चित झालं नसल्यामुळे आघाडीबाबत आताच काही सांगता येत नाही असं विधान पवारांनी केल्यानं पुन्हा चर्चांना उधाण आलं. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार या चर्चा थांबत नाहीत तोवर पवारांचं मविआबद्दल मोठं विधान आलं. 

साहजिकच त्याचे राजकीय पडसाद उमटले. पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं विधान संजय राऊतांनी केलंय...तर पवार ठाकरेंना कंटाळून विधान करत असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय.

शरद पवारांचा स्पष्टीकरण
शरद पवारांच्या विधानावरून राज्यातलं राजकारण तापताच पवारांनी आपल्या विधानाबाबत खुलासा केला. महाविकास आघाडीत ऐक्य राहावं ही आपली भूमिका आहे. जागावाटपाबद्दल काहीच चर्चा झालेली नाही. जागावाटप निश्चित नाही, त्यामुळे भूमिका मांडली. त्यामुळे त्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नका.  कुणी फोडायचं काम करत असेल, तर ती त्यांची रणनीती असेल, आम्हाला काय भूमिका घ्यायची आम्ही घेऊ, मात्र ती भूमिका आज सांगता येणार नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

गेल्याच आठवड्यात अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवारांच्या स्फोटक मुलाखतीची चर्चा रंगली होती. आता शरद पवारांनी आघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं विधान केल्यामुळे मविआबाबत संभ्रमाचं वातावरण तयार झालं. पवारांनी याबाबत खुलासा केला असला तरी वारंवार संभ्रम निर्माण करणाऱ्या घडामोडी घडत असल्यानं मविआत सारंकाही आलबेल नसल्याचंच चित्र आहे. 

मविआच्या वज्रमूठ सभेला गैरहजार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वज्रमूठ सभांना जाणार नाहीत. मविआच्या राज्यातल्या कुठल्याही वज्रमुठ सभेला शरद पवार जाणार नसून, उद्धव ठाकरेंबरोबर तिन्ही पक्षाचे दोन दोन नेते प्रत्येक ठिकाणी संबोधित करतील. 1 मे रोजी मुंबईत वज्रमूठ सभा होतेय. त्यासाठी जोरात तयारी सुरू आहे...पवारही उपस्थित राहतील अशी चर्चा होती...मात्र, पवार कोणत्याही सभेला जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पवार सभांना का जाणार नाहीयेत. याची चर्चा सध्या सुरू आहे.