'बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी वर्तुळातील व्यक्ती कोण?' संजय राऊत यांची गृहमंत्र्यांकडे 'ही' मागणी

Maharashtra Politics : कुख्यात गुंड हेमंत दाभेकरनं वर्षा निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. दाभेकर-शिंदे भेटीवरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणविस यांना ट्विट करत चिमटा काढला आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 5, 2024, 02:35 PM IST
'बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी वर्तुळातील व्यक्ती कोण?' संजय राऊत यांची गृहमंत्र्यांकडे 'ही' मागणी title=

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्ताने गुंड हेमंत दाभेकरने (Hemant Dabhekar) वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आता श्रीकांत शिंद-दाभेकर भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नवा वादाला तोंड फुटलं आहे. गुंड हेमंत दाभेकर हा कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा साथीदार आहे.  गुंड किशोर मारणे खून प्रकरणी शरद मोहळसोबत (Sharad Mohol) हेमंत दाभेकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. हेमंत दाभेकर हा जामिनावर बाहेर असून, शरद मोहोळ याचा अत्यंत जवळचा व्यक्ती मानला जातो. त्यामुळे दाभेकरने खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यने खळबळ उडाली आहे. 

संजय राऊत यांची टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंवर ट्विट करत निशाणा साधलाय. श्रीकांत शिंदेंचा उल्लेख बाळराजे करत त्यांचा शुभेच्छा स्वीकारतानाचा एक फोटो राऊतांनी ट्विट केलाय. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी वर्तुळातील व्यक्ती कोण असा सवाल राऊतांनी विचारलाय. कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली, शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावरुन राऊतांनी टीका केलीय. याप्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी लक्ष घालावं असं म्हणत राऊतांनी ट्विटमध्ये फडणवीसांना टॅग केलंय. 

गुंड हेमंत दाभेकर हा जन्मठेपेची शिक्षा भोगतोय, किशोर मारणे खूनप्रकरणात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यासह दाभेकर हा साथीदार आहे. दाभेकर-श्रीकांत शिंदे भेटीवर राऊतांनी निशाणा साधलाय. तर वाढदिवशी शेकडो लोकं येत असतात, सेल्फी काढत असतात.. असं स्पष्टीकरण मंत्री दीपक केसरकरांनी राऊतांच्या आरोपांवर दिलंय. दरम्यान, संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केलाय. राज्यभरातील गुंडांचं संघटन बनवण्यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलीय, वर्षा बंगल्यावरुन गुंडांचं मॉनिटरिंग होतं असा गंभीर आरोप राऊतांनी केलाय.

भाजपसह मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप
संजय राऊतांनी भाजपसह शिंदेंवर गंभीर आरोप केलेयत. भाजप पीएमएलए कायद्याचा गैरवापर करत असून फक्त विरोधकांसाठी हा कायदा वापरला जातोय, असा आरोप राऊतांनी केलाय. भाजपचे आमदार गायकवाड यांचे शिंदेंनी कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप केलाय. ईडी, सीबीआयवाले काय करतायत...? असा सवाल विचारत सोमय्यांची मिमिक्री करून वर्षावर जाऊन त्यांनी हिशेब मागावा असं आव्हान राऊतांनी दिलंय...

अजित पवारांवरही टीका
बारामतीमधील जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावर राऊतांनी हल्लाबोल केलाय. अजित पवार इतके निर्दयी होतील असं वाटलं नव्हतं. ज्यांनी ताटात खाऊ घातलं, मोठं केलं त्यांच्याबद्दल अशी वक्तव्य करणं ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला.