मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांबरोबर फोनवरुन चर्चा? विनायक राऊत म्हणतात...

राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात, सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

Updated: Jun 28, 2022, 02:25 PM IST
मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांबरोबर फोनवरुन चर्चा? विनायक राऊत म्हणतात...  title=

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) धोक्यात आलं आहे. अशात एक मोटी बातमी समोर येत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना फोन केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. दोघांमध्ये दोन वेळा फोनवरुन चर्चा  झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.  महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फडणवीस यांना हा फोन केल्याचं वृत्त आहे. 21 जूनला दोघांमध्ये संवाद झाल्याचा दावा करण्यात येत आहे. 

मात्र अशी कुठलीही चर्चा झाली नाही, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. ही भाजपची कूटनिती आहे, अशा प्रकारची खोटी माहिती देणं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि स्वत:चा स्वार्थ साधणं हा भाजपाचा इतिहास आहे अशी टीका खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली आहे. 

नागपूरहून ही बातमी पेरली गेली हा भाजपाचा कूटनितीचा भाग आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केलेला नाही, त्यांना जे उघडपणे बोलायचं आहे ते त्यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी बोललेले आहेत. 

त्यामुळे भाजपकडून जे पसरवलं जात आहे त्याला शिवसैनिक भीक घालत नाही. कोणतीही आव्हान आली तरी आम्ही त्याला सामोरं जाण्याची तयारी ठेवली आहे असं विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.