Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला (BJP) दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. लोकसभेला फटका बसल्यानंतर आता विधानसभेसाठी (Vidhansabha Election 2024) भाजपचं केंद्रीय नेतृत्व सक्रिय झालंय. राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. लोकसभेतील चुका टाळत भाजपनं विधानसभेत विजय मिळवण्याचा निश्चय केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही महाराष्ट्राचा दौरा केलाय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मध्य प्रदेशचा पॅटर्न (MP Pattern) वापरणार आहे.
अँटी इन्कमबन्सी आणि भाजपविरोधी वातावरण असूनही मध्य प्रदेशात भाजपचं कमळ फुललं.. शिवराज सिंह चौहान आणि केंद्रीय नेत्यांच्या नियोजनानुसार भाजपनं निवडणूक जिंकून दाखवली. मध्य प्रदेशात विजय मिळवण्याची कुठलीही शक्यता नसताना भाजपने प्रचंड बहुमत मिळवलं. लोकप्रिय योजना आणि ज्येष्ठ नेत्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवून भाजपनं विजयाची किमया साधली होती. आता तोच कित्ता महाराष्ट्रात गिरवण्याचा भाजपचा इरादा आहे.
महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा 'एमपी' पॅटर्न
मध्यप्रदेशातील अनेक दिग्गज मंत्री आणि ज्येष्ठ नेते महाराष्ट्रात दाखल होणार आहेत. निवडून येण्याची साशंकता असलेल्या जागांसाठी या नेत्यांकडून रणनिती आखली जाणार. मध्य प्रदेशच्या धर्तीवर 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्रीय नेतृत्त्व लक्ष ठेऊन आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजप आणि महायुतीत असलेली नाराजी थोपवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरवलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे लोकसभेत पराभूत झालेल्या मोठ्या नेत्यांना विधानसभा निवडणूक लढण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ठरणार गेमचेंजर?
मध्य प्रदेशात भाजपनं लाडली बहन योजना सुरू केल्यानंतर जवळपास 50 टक्के महिलांनी भाजपला मतदान केलं होतं. आता राज्यातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यात येतेय. मध्यप्रदेशच्या निवडणुकीत संघानं महत्त्वाची भूमिका बजावत भाजपच्या विजयात मोठा हातभार लावला होता. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात आता संघही अॅक्टिव्ह झालाय. तसंच विविध राज्यातील जवळपास 60 प्रवासी नेते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
महाराष्ट्रात मध्यप्रदेशची पुनरावृत्ती करण्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे प्रयत्न आहेत. मात्र महाराष्ट्रात भाजपचा हा एमपी पॅटर्न यशस्वी होतो का हे निकालानंतरच समजू शकेल. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 125 जागांचं टार्गेट ठेवलं आहे. यातल्या निवडून येणाऱ्या 50 जागांव्यतिरिक्त 75 जागांवर विशेष लक्ष केंद्रीय केलं जाणार आहे.