Maharashtra Politics : काँग्रेसमधील प्रदीर्घ कारकिर्दीला रामराम ठोकून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपचा (BJP) झेंडा हाती घेतलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश सोहळा मंगळवारी पार पडला. दोनवेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या चव्हाणांनी भाजपात नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली चव्हाणांची पहिली इनिंग संपली. त्यांची भाजपातली नवी इनिंग दिल्लीच्या राजकारणातली असेल, अशी सूत्रांची माहिती आहे.
इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर भाजपची ताकद वाढली
गेल्या काही काळात शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेसचे दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आधीच भाजपसोबत आहेत. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही काँग्रेसचा हात सोडत, भाजपला साथ दिलीय. यामुळे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपची ताकद आणखी वाढवली आहे. याआधीही राज्याातील प्रमुख पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी काही नेते भाजपात येतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप 40 +?
लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात चाळीसपेक्षा जास्त जागा मिळवेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
अशोक चव्हाण
अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर 8 डिसेंबर 2008 रोजी अशोक चव्हाण पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 2009 मध्ये त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसनं विधानसभा निवडणुका जिंकल्या. 7 नोव्हेंबर 2009 रोजी त्यांनी दुस-यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र 11 नोव्हेंबर 2010 रोजी आदर्श घोटाळ्यातील आरोपानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्षं सूत्रं सांभाळली. 1987 आणि 2014 मध्ये नांदेडमधून ते दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले.
एकनाथ शिंदे
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. वयाच्या 18 व्या वर्षापासून एकनाथ शिंदे हे राजकीय जीवनात सक्रीय आहेत. 1997 मध्ये एकनाथ शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. 2001 मध्ये ते महापालिकेत विरोधी पक्ष नेता बनले. 2005 मध्ये नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं पक्षातील वजन आणखी वाढलं. युती सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद भूषवले होतं. 2023 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं आणि भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली.
अजित पवार
अजित पवार हे सध्या शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडीत असताना ते विरोधी पक्ष नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधले ते एक बडे नेते आणि अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत. अजित पवार तीन वेळा महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. अजित पवार 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत. 2019 मध्ये त्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण 3 दिवसातच त्यांनी राजीनामा दिला. 2023 मध्ये त्यांनी बंड केलं आणि राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. शरद पवार यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
छगन भुजबळ
छगन भुजबळ हे सध्या शिंदे सरकारमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. 1991 मध्ये त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेतून केली. 1991 मध्ये त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये शरद पवार यांनी रा्ष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर भुजबळ शरद पवार यांच्यासोबत आले. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली.