Maharashtra Politics : अजितदादा फडणवीसांचा 'तो' बदला घेणार?

चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची सेमीफायनल मानली जात आहे, त्यामुळे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे

Updated: Feb 22, 2023, 03:10 PM IST
Maharashtra Politics : अजितदादा फडणवीसांचा 'तो' बदला घेणार? title=

विनोद पाटील, झी मीडिया, मुंबई : चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad By Election) मविआ (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) आमनेसामने दिसत असले तरी ही निवडणूक म्हणजे खऱ्या अर्थानं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यातला सामना आहे. यामागे महत्त्वाचं कारण आहे ते पंढरपूर पोटनिवडणुकीचं (Pandharpur By Election). पंढरपूरमधले राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली.  या पोटनिवडणुकीत भाजपकडून समाधान अवताडे (Samadhan Autade) यांना रिंगणात उतरवण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना ही पोटनिवडणूक झाली. आता सत्ताधारी मविआ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला होती. तर तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ही पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. 

फडणवीसांचा इशारा, मविआचा करेक्ट कार्यक्रम 
पंढरपुरातून भाजपला विजयी करा मविआचा करेक्ट कार्यक्रम करतो असा इशारा फडणवीसांनी पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत दिला होता. या निवडणुकीत भाजपच्या अवताडेंचा विजय झाला. त्यानंतर वर्षभरानं हे मविआ सरकार कोसळलं. 

राष्ट्रवादी भाजपविरोधात स्कोअर सेटल करणार?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2019) राष्ट्रवादी काँग्रेसनं 54 जागा जिंकल्या. मात्र पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतल्या पराभवामुळे राष्ट्रवादीची संख्या 54 वरून 53 वर आली. तर भाजप आमदारांची संख्या 105 वरून 106 वर गेली. आता चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पर्यायाने अजितदादांना भाजप आणि फडणवीसांचा वचपा काढण्याची आयती संधी चालून आली आहे. गेली अनेक वर्ष पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) हे एकेकाळी अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात होते.  मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि ते भाजपकडून निवडून आले. त्यानंतर त्यांनी 2019 ला विजयाची पुनरावृत्ती केली. काही दिवसांपूर्वी दुर्धर आजारानं लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक जाहीर झाली. भाजपनं त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांना मैदानात उतरवलं. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीनं नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी दिली आहे.  अजित पवारांनी ही पोटनिवडणुकीत अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे, या पोटनिवडणुकीत जातीनं लक्ष घातलं असून ते मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत.

पोटनिवडणुकीत जिंकणारा महापालिकेवर झेंडा फडकवणार? 
प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेचीही निवडणूक (Pimpri-Chinchwad Municipal Election) आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही महापालिका निवडणुकीची सेमीफायनल समजली जात आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत म्हणजे 2017 ला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपनं झेंडा फडकवला होता.  त्याआधी 2012  मध्ये राष्ट्रवादीनं पिपंपरी-चिंचवड महापालिकेवर पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली होती. त्यामुळेच या पोटनिवडणुकीच्या निकालाचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीसाठी ही पोटनिवडणुकी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.