'स्टॅम्पपेपर आणा लिहून देतो...' पक्षाच्या निर्णयावर अजित पवार स्पष्टच बोलले

अखेर शरद पवारांनी भाकरी फिरवलीय. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत खांदेपालट करण्यात आलेत. पण यामुळे अजित पवार नाराज असल्याचं बोललं जात होतं, यावर अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं.

अरूण म्हेत्रे | Updated: Jun 10, 2023, 07:50 PM IST
'स्टॅम्पपेपर आणा लिहून देतो...'  पक्षाच्या निर्णयावर अजित पवार स्पष्टच बोलले title=

Maharashtra Politics : शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा (NCP President) राजीनामा दिला होता.. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावरून चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवार यांनी हा निर्णय बदलला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शरद पवारांनी एकप्रकारे आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा करत जबाबदारीचं वाटप केलंय. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच पक्षात कार्यकारी अध्यक्षपद निर्माण करण्यात आलंय. कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) नियुक्ती करण्यात आलीय. तर अजित पवारांकडे (Ajit Pawar) मात्र पक्षांतर्गत कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमांनंतर अजित पवार तडकाफडकी तिथून निघून गेल्यानंतर अजित पवारांना साईड ट्रॅक केल्याची चर्चा रंगली. अखेर यावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी तिथून लगेच निघालो, कारण एका कार्यक्रमानिमित्ताने मला विमान पकडायंच होतं.  इतर सर्व नेते तिथे होते असं सांगत अजित पवार यांनी पक्षातील निर्णयाबाबत मी समाधानी असल्याचं सांगितलं.  अजित पवार नाराज अशा बातम्या चालवण्यात आल्या होत्या. पण त्या सर्व खोटं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने एक समिती स्थापन केली होती. त्यात शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा असा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बैठकीत सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून जाहीर करावं असं आपण सुचवलं. पण इतर नेत्यांनी सध्या फक्त पवारांचा राजीनामा मागे घ्यावा इतकाच विषय घेऊन तो संपवून टाका असं सूचवलं. लोकशाही काम करत असता बहुसंख्य मतांचा आदर करायचा असतो, त्यानुसार सुप्रिया सुळेंचा विषय राहिला. 

अखेर आज शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित केलं. पक्षात नवीन नेतृत्व पुढे यायला हवं, सुप्रिया सुळे गेली अनेक टर्म बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत, त्या एक उत्तम संसदपटू आहेत, अनेक वेळा त्यांना नावाजलं गेलं आहे असं शब्दात अजित पवार यांनी निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं.

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजानामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा रंगली. पण मी त्यावेळीही सांगितलं होतं, मी राज्याच्या राजकारणात आहे तर सुप्रिया सुळे राष्ट्रीय राजकारणात आहेत. अजित पवार यांच्यावर राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी आहे. मी स्टॅम्पपेपरवर लिहून देतो मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. हा आमचा पक्षांतर्गतला प्रश्न आहे, इतरांनी त्यात नाक खुपसायचं कारण नाही. पक्षात उत्तम टीमवर्क असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.