'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी

शिवसेनेचे यंदा दोन वर्धापन दिन सोहळे होत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा संध्याकाळी षण्मुखानंद सभागृहात तर शिंदे गटाचा गोरेगावमधील नेस्को मैदानावर वर्धापन दिन पार पडणार आहे. त्याआधी दोन्ही गटाकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.

Updated: Jun 19, 2023, 02:36 PM IST
'मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही...' शिवसेनेच्या वर्धापनदिनी दोन्ही गटाकडून बॅनरबाजी title=

Maharashtra Politics : शिवसेनेचा आज वर्धापन दिन (Shivsena Foundation Day) आहे. बंडखोरीनंतर यंदा शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत. शिवसेनेच्या 57 वर्षाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून आज शिवसेनेचे दोन वेगळे वर्धापन दिन साजरे होणार आहेत. दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. संध्याकाळी 6.30 वाजता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून (Shinde Group) गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातोय. रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं भाषण होईल.

 वर्धापन दिनासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आलीय. मुंबईभर पोस्टर्स (Banners) लावण्यात आलीय. शिंदे गटकडून लावण्यत आलेल्या पोस्टर्समधून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही... कधीच नाही... असं पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. 

ठाकरे गटाचा सायनमध्ये वर्धापन दिन
ठाकरे गटाचा सायन इथल्या षण्मुखानंद इथं वर्धापन दिन होणारेय. त्यानिमित्त ठाकरे गटाकडून मोठी पोस्टरबाजी केली जातंय. ज्यातून पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्ह गायब होवून मशाल चिन्हानं जागा घेतलीय. तसंच शिंदे गटात गेलेल्या मनिषा कायंदे (Manisha Kaynde) यांचा फोटो पोस्टरमधून फाडून टाकण्यात आलाय. ठाकरे गटाच्या महाशिबिरातून संजय राऊतांनी (Sanjay Raut) स्वबळाचा नारा दिला. उद्धव ठाकरे सांगतील तोपर्यंतच मविआत राहू असं म्हणत राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला इशारा दिला. त्यावर अजित पवारांनी संजय राऊतांना आपल्या खास शैलीत टोला लगावला.. राऊत प्रवक्ते आहेत, अंतिम निर्णय ठाकरेच घेतात असा टोला अजित पवारांनी लगावला.. त्यानंतर राऊतांनी मवाळ भूमिका घेत सारवासारव केली.. महाविकास आघाडीचा फेविकॉलचा मजबूत जोड आहे अशी सारवासारव राऊतांनी केली..  तर शिवसेनेची पदं शिवसेनेकडेच राहतील असा दावा संजय राऊत यांनी केला. राष्ट्रवादीचा विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावर डोळा असल्याच्या शक्यतेचा त्यांनी इन्कार केला. 

देशात, राज्यात आणि मुंबईत सत्ताधारी पक्षाकडून कशी लूट केली जात आहे असं सांगत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी चारोळीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, शाहा, मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला. दोन मस्ताने जसे दिल्लीत आहेत, तसे महाराष्ट्रातही आहेत .ते महाराष्ट्र आणि मुंबईला लुटतायत, अशी टीका केली. 

शिंदे गटाचा गोरेगावात वर्धापन दिन
गोरेगावच्या नेस्को मैदानात शिंदे गटाचा मेळावा होणारेय. मेळाव्यासाठी मैदानात कार्यकर्ते जमायला सुरूवात झालीये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिंदे समर्थक नेस्को मैदानात दाखल होतायत. शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को मैदानात होणारेय. त्यानिमित्त वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दोन्ही बाजुला भगवे झेंडे, बॅनर्स, डिजिटल बॅनर्स लावण्यात आलेत.  दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनावरून भाजप नेते नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. हिंदुत्त्व गहाण ठेवलेल्या उद्धव ठाकरेंना वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. त्यांचं राजकीय धर्मांतर झालंय. त्यामुळे 28 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय राजकीय धर्मांतर दिन साजरा करावा अशी मागणी केलीय. बंडखोरीनंतर शिंदे गटाकडून पहिल्यांदाच पक्षाचा वर्धापन दिन साजरा केला जातोय.