सत्तासंघर्षामुळे आघाडीत संघर्ष, ठाकरे सरकार कुणाच्या चुकीमुळे पडलं?

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जुंपलीय. ठाकरे सरकार कुणामुळे पडलं यावरुन एकमेकांकडे बोट दाखवणं सुरु झालंय.

राजीव कासले | Updated: May 12, 2023, 08:33 PM IST
सत्तासंघर्षामुळे आघाडीत संघर्ष, ठाकरे सरकार कुणाच्या चुकीमुळे पडलं? title=

Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आला. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना परत आणलं असतं असं महत्त्वाचं भाष्य सुप्रीम कोर्टानं केलं. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि नाना पटोलेंमध्ये (Nana Patole) कलगीतुरा रंगलाय. अजित पवारांनी ठाकरे सरकार पडण्याला नाना पटोलेंना जबाबदार धरलंय. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं राजीना दिला. राजीनामा देण्याची गरज नसताना तो दिला गेला. राजीनामा दिल्यानंतर लगेचच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊन तो विषय संपवायला हवा होता. जर ते पद लवकर भरंल गेलं असतं आणि 16 आमदरांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली काढला असता असं अजित पवार यांनी म्हटलंय. 

नाना पाटोलेंचं उत्तर
अजित पवारांच्या या भूमिकेवर नाना पटोले चांगलेच संतप्त झालेत. अजित पवार सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे आहेत का असा सवाल विचारत पटोलेंनी दादांवर निशाणा साधलाय. सुप्रिम कोर्टापेक्षा अजित पवार मोठे नाहीएत. त्यांच्या पक्षाच्या उपाध्यक्षांना अधिकार होते, ते त्यांनी का वापरले नाहीत, याचं उत्तर ते का देत नाहीत असा प्रति प्रश्न नाना पटोले यांनी विचारलाय. 

शरद पवारांनी केलं होतं भाष्य
यापूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर आपल्या आत्मचरित्रातून भाष्य केलं होतं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेत वादळ येईल याचा अंदाज नव्हता. शिवसेनेतला असंतोष उद्रेक शमवायला सेना नेतृत्त्व कमी पडलं. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कोसळण्याआधी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्या टप्प्यात माघार घेतली, अशा शब्दात पवारांनी ठाकरेंच्या सत्तासंघर्षातल्या भूमिकेवर बोट ठेवलं होतं. 

सुप्रीम कोर्टाचा निकाल काय होता?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) बाजूनं कौल दिला. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर परखड निरीक्षणं नोंदवली आहेत.  विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.  त्यामुळं उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रश्नच येत नाही. सुप्रीम कोर्ट त्यावेळची 'जैसे थे' परिस्थिती प्रस्थापित करु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात म्हटल आहे. 

सत्तासंघर्ष प्रकरणात उद्धव ठाकरेंचा राजीनामा कळीचा मुद्दा ठरला होता. खुद्द शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रातून ठाकरेंच्या भूमिकेवर भाष्य केलं होतं. त्यात आता नाना पटोलेंच्या भूमिकेवर अजित पवारांनी सवाल उपस्थित केलेत. त्यामुळे सत्तासंघर्षानंतर एकीकडे शिंदे-भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण असताना मविआमध्ये मात्र तीनही पक्ष सरकार कुणामुळे पडलं यावरनं एकमेकांशी भिडलेत.