Mega Block : प्रवासी कृपया इथे लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? पाहा

रविवारी म्हणजे 14 मे रोजी मध्य (Central) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (Harbour) मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात जर तु्म्ही रेल्वेने प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा आणि मगच घराबाहेर पडा.

राजीव कासले | Updated: May 12, 2023, 08:09 PM IST
Mega Block : प्रवासी कृपया इथे लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? पाहा title=

Central Railway Mega Block : रविवारी म्हणजे 14 मे रोजी रेल्वेने प्रवास करणार असाल तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मध्य (Central) आणि हार्बर रेल्वे मार्गावर (Harbour Railway Line) रविवारी मेगा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार असल्याचं मध्य रेल्वे व्यवस्थापनाने जाहीर केलं आहे. अभियांत्रिकी (Engineering) आणि देखभालीच्या (Maintenance) कामासाठी हा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 

मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक
मध्ये रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) मुंबई इथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील लोकल (Slow Local) माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर (Fast Local) वळवण्यात येणार आहेत. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून नियोजित वेळेच्या 15 मिनिटं उशिराने पोहोचतील. तर कल्याण इथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 पर्यंत  सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

या लोकल ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव इथं थांबून पुढे माटुंगा इथं अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि   गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत  सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 14 मिनिटे उशिराने पोहोचतील.

हार्बर मार्गावर ब्लॉक
हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल इथून सकाळी 10.33 ते  दुपारी3.49 वाजेपर्यंत  सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.2 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे इथून सकाळी 10.1 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. तसंच ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.