विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात, म्हणाल्या 'सटर-फटर लोकांमुळे...'

 विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. 

Updated: Jul 7, 2023, 02:56 PM IST
 विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे  गटात, म्हणाल्या 'सटर-फटर लोकांमुळे...' title=

Neelam Gorhe : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला.

काय म्हणाल्या निलम गोऱ्हे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेृत्तात शिवसेना योग्य मार्गावर चालली आहे. महिला विकास आणि देशविकासाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय आपण घेतल्याचं निलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं. भारतातील विचारसरणीपैकी 1992 नंतर एनडीए आणि युपीए अशा आघाड्या झाल्या. 1998 म्हणजे आता पंचवीस वर्ष झाली. त्यावेळी राजकीय विश्वहातार्य असलेला पक्ष, मराठी, हिंदुत्व आणि महिला धोरण असलेल्या पक्षात 1998 साली हिंदुह्रदय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात प्रवेश केला. 

शिवसेनेत आपल्याला खूप चांगलं काम करत आलं. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निर्देश दिला आहे, की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हा अधिकृत पक्ष आहे. केंद्रीय स्तरावर एनडीए आणि भाजपाच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचं मंदिर, तलाकपीडित महिलांना न्याय,  काश्मिरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरि कायद्याबाबत सकारात्म पावलं उचलली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा यांची सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती आहे. 1985 ला शाहाबानो खटल्यात न्यायालयाने शाहाबानोला पोटगी मिळावी असा निर्णय दिला होता. पण विरोध आणि दबावाला बळी पडून तत्कालीन सरकारने मुस्लिम महिला घटस्फोटाचा अधिकार संरक्षण कायदा 1986 संमत केला. त्यामुळे महिलांना दुजाभाव सहन करावा लागला. राष्ट्रीय स्तरावर ही भूमिका घेऊन शिवसेना काम करत आहे. शेतकरी, महिलांच्या प्रश्नावर काम करत आहेत. त्यामुळे मी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन करत आहे असं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं. यावेळी सटर फटर लोकांमुळे पक्षात नाराज होण्याचं कारण नाही असं म्हणत नीलम गो-हेंनी सुषमा अंधारेंचं नाव न घेता टोला लगावलाय. 

ठाकरे गटातून गळती सुरुच
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरुच आहे. काही दिवसांपूर्वीच उपनेते शिशिर शिंदे आणि विधानपरिषद आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी देखील ठाकरे गटाला (Thackeray Group) 'जय महाराष्ट्र' केला होता. आता विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. नागपूर अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे काही आमदारांनी तक्रार केल्यानंतर गोऱ्हेंचं नाराजीनाट्य सुरु झाल्याचे म्हटलं जातं. उपसभातपी असून देखील आमदारांना त्या बोलू देत नाही अशी तक्रार काही आमदारांनी केली होती.