मुंबई : महाराष्ट्र पोलीस जनतेच्या हितासाठी सतत प्रयत्नशील आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता ते कोरोना काळात अहोरात्र सेवा देत आहेत. त्यासोबतच पोलिसांकडून जनतेला सतत मास्क लावण्याचं, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी पुन्हा एकदा हटके अंदाजात सर्वांना मास्क लावण्याची आठवण करुन दिली आहे. झी मराठी वाहिनीवरील 'अंग बाई सासू बाई' या मालिकेतील विचित्र वागणाऱ्या बबड्याचं, त्याने मास्क लावल्याचं एक चांगलं उदाहरण देत त्यांनी सर्वांना मास्कचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. बबड्या चांगला आहे की वाईट आम्हाला ठाऊक नाही पण बबड्या मास्क लावून जबाबदार नागरिकाची कर्तव्य पार पाडत असल्याचं महाराष्ट्र पोलिसांनी म्हटलं आहे.
कथानकात 'ट्विस्ट' आहे!
बबड्या चांगला की वाईट आम्हाला ठाऊक नाही परंतु बबड्या एक जबाबदार नागरिक नक्कीच आहे.#UseAMask#FollowUnlockGuidelines pic.twitter.com/vNB2VIkWX8
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) August 20, 2020
लॉकडाऊननंतर आता अनलॉकच्या प्रक्रियेत अनेक गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. काही बाबी वगळता सर्वच गोष्टी हळू-हळू सुरु करण्यात येत आहेत. सगळं सुरु होत असलं तरी, महाराष्ट्र सरकारने सांगितल्या नियमांचं पालन करणं अनिर्वाय आहे. याचीच आठवण करुन देत महाराष्ट्र पोलिसांनी सर्व जनतेला मास्क वापरण्याचं आणि सरकारच्या गाईडलाईन्सचं पालन करण्याचं सूचक आवाहन केलं आहे.