मुंबई : आपण कोरोना संकटाचा सामना खंबरपणे करत आहोत. त्याला यशही येत आहे. मात्र, काही ठिकाणी परिस्थिती थोडी जास्तच आहे, हे नाकारुन चालणार आहे. तेथे नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु आहेत. त्यामुळे आर्थिक संकट आहे. उद्योग-धंदे बंद आहे, हे खरे असले तरी राज्याची खरी संपत्ती जनता आहे. त्यामुळे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. कोरोना झाला म्हणजे सगळे संपले असे होत नाही. आज ८२ वर्षांची आजी ठणठणीत होऊन घरी परतली आहे. त्यांचे स्वागत सर्वांनी केले. समाजमाध्यमावर याचा व्हिडिओही आहे, असे सांगत राज्यातील जनेतला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले लॉकडाऊन ३ मे रोजी संपत आहे. त्यानंतर लॉकडाऊन पुन्हा वाढणार का, की शिथीलता आणणार याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल बोलताना काही ठिकाणी लॉकडाउन वाढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे संकेत दिले आहेत. ऑरेंज झोनमध्ये शिथिलता देण्याचे संकेत देताना ग्रीन झोनमध्ये हळूहळू सर्व व्यवहार सुरु होतील. लगेच सगळे होणार नाही. प्रथम सर्वांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, ते म्हणालेत.
लॉकडाऊन सुरु आहे. तीन मे नंतर काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही काय करायचे किती वेळ घरी बसायचे, असा अनेकांना प्रश्न तुम्हाला पडला असेल. अर्थचक्र रुतले आहे. बेरोजगारी वाढणार असे सांगितले जात आहे. काहींच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ते खरे आहे, त्याला नाकारु शकत नाही. पण अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खरी संपत्ती जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे. नागरिक वाचले पाहिजे. त्यानंतर सगळे सुरुळीत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
ऑरेंज झोनमध्ये शिथिलता देण्याचे संकेत देताना ऑरेंज झोनमध्ये काही परिसर सोडले तर उरलेल्या ठिकाणी काय सुरु करु शकतो याचा विचार करत आहोत. ग्रीन झोनमध्ये आपण थोडी शिथिलता आणत आहोत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच जे परराज्यात जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यांच्यासाठी आपण सोय करत आहोत. पण लगेच झुंबड करु नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.