मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मुंबई ते सोलापूर (Mumbai to Solapur) आणि मुंबई ते शिर्डी (Mumbai to Shirdi) या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसना (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखविला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना केंद्र सरकरचा शिंदे-फडणवीस सरकारला पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचं सांगितंल. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 13 हजार 500 कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे, त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
याप्रसंगी वाकोला ते कुर्ला आणि सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडवरील एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस फ्लायओव्हर आणि मालाडमधील कुरार व्हिलेजमधील वाहनांसाठी दोन अंडरपासचे देखील लोकार्पण करण्यात आलं.
नुकत्याच झालेल्या एका जागतिक सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात लोकप्रिय नेते असल्याचे जाहीर झालं आहे, ही देशवासीयांसाठी गौरवाची बाब असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.
सिंचन, रस्ते प्रकल्प कृषी इन्फ्रा, गृहनिर्माण, स्टार्टअप, महाराष्ट्र सर्व क्षेत्रात या केंद्रीय अर्थसंकल्पातून खूप काही मिळाले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचा जो निर्धार पंतप्रधानांनी केला आहे. त्यात महाराष्ट्रही आपले एक ट्रिलियनचे योगदान देण्यासाठी कठोर प्रयत्न करेल.
आजच्या कार्यक्रमास केंद्रीय सुक्ष्म लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित होते.