राज्य सरकार एअर इंडियाची इमारत विकत घेण्याच्या तयारीत

नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत विकत घेण्याचा राज्य सरकार विचार करत आहे.

Updated: Jan 17, 2019, 09:25 AM IST
राज्य सरकार एअर इंडियाची इमारत विकत घेण्याच्या तयारीत title=

मुंबई - नरिमन पॉईंट येथील एअर इंडियाची इमारत विकत घेण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. एकीकडे आर्थिकदृष्ट्या डबघाईला आल्याने एअर इंडियाने ही इमारत विकायला काढली आहे. तर दुसरीकडे स्वतःच्या डोक्यावर कर्जाचा बोजा असताना राज्य सरकार ही इमारत विकत घेण्याचा विचार का करते आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नरिमन पॉईंट येथील मोक्याच्या जागी असलेली ही २३ मजली इमारत कोणतीही खासगी कंपनी विकत घ्यायला तयार नाही. केवळ राज्य सरकार आणि भारतीय जीवनबिमा निगम (एलआयसी) हे दोघेच यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता यांच्यापैकी कोण ही इमारत घेणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

एअर इंडियाचे मुख्यालय पूर्वी मुंबईत याच इमारतीमध्ये होते. २०१३ साली एअर इंडिया व्यवस्थापनाने आपले मुख्यालय दिल्लीला हलवले आणि मग तिथून सर्व कारभार होऊ लागला. तेव्हापासून नरिमन पॉईंटमधील इमारत केवळ नावापुरता उरली आहे. इमारतीतील काही मजले भाड्याने देण्यात आले आहेत. पण त्यातून हवे तेवढे उत्पन्न एअर इंडियाला मिळत नाही. एअर इंडिया आर्थिक अडचणीत असल्यामुळे ही इमारत विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण इमारत विकत घेण्याला कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ती विकत घेण्याची तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारची मुंबईतील अनेक कार्यालये सध्या भाडेतत्त्वावर सुरू आहेत. ती बंद करून या एकाच इमारतीत त्यांचे स्थलांतर करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्याशिवाय मंत्रालयापासून एअर इंडियाची इमारत हाकेच्या अंतरावर आहे. त्याचाही उपयोग होऊ शकतो. यामुळेच राज्य सरकारने ही इमारत विकत घेण्याची तयारी सुरू केली आहे.  एलआयसी सुद्धा ही इमारत विकत घेण्यासाठी इच्छुक आहे. एलआयसीचे मुख्यालय या इमारतीच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही ही इमारत विकत घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.