काँग्रेस आमदारांना तातडीनं मुंबईत हजर होण्याच्या सूचना

भाजपाकडून फोडाफोडीचं राजकारण करत आमदारांना संपर्क केला जात असल्याचा संशय

Updated: Nov 7, 2019, 08:09 PM IST
काँग्रेस आमदारांना तातडीनं मुंबईत हजर होण्याच्या सूचना  title=

दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सत्तापेचात आता काँग्रेस पक्षही चांगलीच सक्रीय झालाय. जनतेनं निकालातून दिलेल्या कौलात चौथ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस पक्षानं आपल्या आमदारांना तातडीनं मुंबईत बोलावलंय. उद्यापर्यंत मुंबईत पोहचण्याच्या सूचना आमदारांना पोहचत्या करण्यात आल्यात. मुंबईत काँग्रेस आमदारांची उद्या बैठक होणार आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेऊन शांत असलेल्या काँग्रेसच्याही गोटात हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. 

उद्या शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी विधानसभेची आणि सद्य काळजीवाहू सरकारची मुदत संपत आहे. पुढील निर्णय घ्यायला सोपं जावं म्हणून काँग्रेसने आमदारांना मुंबईत बोलावल्याचं काँग्रेसच्या सूत्रांकडून सांगण्यात येतंय. त्याचबरोबर भाजपाकडून फोडाफोडीचं राजकारण करत आमदारांना संपर्क केला जात असल्याचा संशयही आहे. त्यामुळेच, खबरदारीचा उपाय काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत पाचारण केलंय. 

 

भाजप-शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा तिढा सुटत नसल्यानं आमदारांची फोडाफोडी होण्याची भीती काँग्रेसलाही वाटू लागलीय. भाजपनं काँग्रेस आमदारांशी संपर्क सुरू केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलाय. त्यामुळे काँग्रेसनं आमदारांना मुंबईत बोलावल्याचं वृत्त आहे. साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर भाजपनं निवडणुकी आधीपासूनच सुरु केला होता आणि आताही तेच करत आहे, असा आरोप थोरात यांनी केलाय.