मुंबई : महाराष्ट्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाशी झगडला. या पहिल्या कोरोनाच्या दोन लाटांमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवावर उदार होवून सेवा जनतेची सेवा केली. आता पुन्हा तेवढ्याच जोराने नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) आणि कोरोनाचा (Corona) सामना करतोय. या पार्श्वभूमीवर राज्यात सुधारित नियमावली जाहीर (Maharashtra Corona Revised Guidline) करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे. (maharashtra chief minister uddhav thackeray appeal state people to follow corona rules)
मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं?
" कोरोनाच्या विषाणूशी लढतांना आपल्याला 2 वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या. तसेच काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. त्यामुळे तो किती धोकादायक आहे किंवा नाही यावर चर्चा न करता या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो", अशी काळजीपोटी भिती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाऊनबाबत काय म्हणाले?
"मी सातत्याने टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभागाशी चर्चा केली. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी चर्चा करुन राज्यात काही निर्बंध लावण्याचं ठरवलं. आपल्याला कुठलाही लॉकडाऊन करून सगळं ठप्प करायचं नाही. फक्त नियम आणि कायदे करून कोरोनासारख्या आव्हानांचा मुकाबला करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव कोरोनावर घालायचाच, या निश्चयाने आरोग्याचे नियम पाळा", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
"रोजी रोटी बंद करायची नाही"
"आपल्याला काम बंद करायचं नाही तर गर्दी बंद करायची आहे. रोजी रोटी बंद करायची नाही, जीवनामान थांबवायचं नाही. मात्र काही निर्बंध पाळून राज्याला या कोरोनापासून मुक्त करायचंय", असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
अशी आहे राज्यातील नियमावली
राज्यात रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. तसंच सुधारित नियमावलीत शाळा, महाविद्यालय, हॉटेल, मॉल्स, शॉपिंग मॉल, मैदानं, क्रीडांगणांसाठी ही निर्बंध लावण्यात आले आहेत.
काय बंद असणार?
राज्यात मैदानं, पिकनिक स्पॉट, स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असतील.
हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
हॉटेलवर निर्बंध घालण्यात आली आहेत. सुधारित नियमावलीनुसार, एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेनेच हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच रात्री 10 वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवता येणार आहेत.
हॉटेल रेस्टॉरंटमध्येही दोन्ही डोस पूर्ण झालेल्या लसवंतांनाच परवानगी असणार आहे. तसेच होम डिलीव्हरी पूर्ववेळ सुरु राहिल.
तसेच राज्यात प्रवेश करण्यासाठी दोन्ही डोस झालेलं असणं बंधनकारक असणार आहे. तसेच आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असायला हवा.