दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रामध्ये लवकरच १२,५०० हजार पोलिसांची भरती होणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पहिल्यांदाच पोलिसांची एवढी मोठी भरती होणार आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.
पोलीस भरतीबाबतच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल, असा विश्वासही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसंच लवकरच या भरतीसाठीची प्रक्रिया सुरू होईल, असं ते म्हणाले.
पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे १०० टक्के भरणार. पदभरतीसाठी वित्त विभागाच्या दि.४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
पोलीस भरतीसह बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनाही संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. तसंच राज्यात कृषी महोत्सव योजना राबवण्याला आणि अंबड येथे जिल्हा आणि तालुका न्यायालय स्थापन आणि पद निर्मितीला मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे.