Chitra Wagh Reaction On Badalapur Encounter: झी 24 तासच्या 'जाहीर सभा' कार्यक्रमात महाराष्ट्राच्या राजकारणातील विविध नेत्यांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. भाजपच्या विधानसभा आमदार चित्रा वाघ यांनी यावेळच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली. मी एका सामान्य घरातून आलेली स्त्री आहे. मला राजकारणाचा इतिहास-भूगोल अजिबात नाही. मी ज्या जातीतून आहे, त्यातील मी पहिली महिला असल्याचे त्या म्हणाल्या. तुम्ही आक्रमक पद्धतीने टीका करता, त्यामुळे तुम्हाला आमदारकी मिळाली का? सुप्रिया सुळे बोलतील त्यांना चित्रा वाघ उत्तर देतील असं ठरललेलं असतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना असं काही ठरलेलं नसतं. पण मला या सर्वाची चीड येते. आम्ही 2020 पर्यंत सीएमओला बोलत होतो. तेव्हा सुप्रिया सुळे सोबत होत्या. मग नंतर दुटप्पीपणा का? एका ठिकाणी महिलांचा कळवळा करता मग दुसऱ्या ठिकाणी असं का वागता? असा प्रश्न त्यांनी सुप्रिया सुळे यांना विचारला. असे ट्वीट करताना मला कोणाची भीती वाटत नाही. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. जे चेहऱ्यावर चेहरे चढवून वावरतात, त्याची मला चीड आहे. मी कधी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर लिहित किंवा बोलत नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी चित्रा वाघ यांना बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, 'एक आई म्हणून हरामखोराला गोळ्या घालायला हव्यात, असेच मी म्हणेन. आपण हे करु शकत नाही हे राजकीय नेत्यांना माहिती असते. असे असताना 'त्याला भरचौकात फाशी द्या' असे ते म्हणतात. तुमचे सरकार असतं तर हे केलं असत का? असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला. याला लोकांच्या भावनांशी खेळणं असे म्हणतात, असे त्यांनी सांगितले.
अक्षय शिंदेने पोलिसांवर हल्ला केला. त्याने पोलिसांना मारायला हवं होतं का? त्याच्या हल्ल्याला पोलिसांकडून प्रत्युत्तर देताना तो मारला गेला. यावर काहींनी राजकारण केलं. एका ठिकाणी पिडितांच्या बाजुने बोलायचे मग नंतर आरोपी मारला गेला की त्याच्यावरही प्रश्न उभे करायचे. छोट्या मुलींच्या परिवाराला त्रास झाला त्याच्याशी तुम्हाला काही देणंघेणं नव्हतं का? तुम्हाला फक्त सरकारला विरोध करायचा होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ मागे हटल्या, अशी टीका केली जाते. यावर त्यांनी उत्तर दिले. 'पूजा चव्हाण प्रकरणात मी मागे हटणार नाही. मी माझा प्रश्न उभा केलाय. त्याचा निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल. पण चित्रा वाघने केस मागे घेतली अशा खोट्या बातम्या येतात, असे त्या म्हणाल्या. आमदार झाले म्हणून लढाई सोडली नाही. संजय राठोडला उद्धव ठाकरे सरकारने क्लीन चीट दिली. त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारायला हवा', असे त्या म्हणाल्या.
10 शरद पवार म्हणजे एक देवेंद्र फडणवीस आहेत. या विधानावरुन मला लोकं ट्रोल करतील पण आज नाहीतर उद्या तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यास मला आवडेल असे त्यांनी यावेळी सांगितले.