'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा

Amit Thackeray: 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले' असे म्हणत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 13, 2024, 06:15 PM IST
 'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी उमेदवार फोडले', अमित ठाकरेंचा काकांवर निशाणा title=
अमित ठाकरे

Amit Thackeray: माहिम विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी माहिमकरांचे प्रश्न, राजकारणाचा चिखल, ठाकरे बंधुंचे संबध, स्वत:चे आजारपण अशा विविध विषयांवर भाष्य केले. मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेले यावर बोलताना त्यांनी काका उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  

'आजारपणाच्या काळात उद्धव ठाकरेंनी नगरसेवक फोडले' असे म्हणत अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. आजारी असताना राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी त्रास दिला. नगरसेवक फोडाफोडीपासून आमच्यातील संवाद संपल्याची माहिती त्यांनी 'झी 24 तास'च्या जाहीर सभेत बोलताना दिली. 

दुर्धर आजाराचा काळ तुमच्यासाठी खूप कठीण होता. त्यावेळी राज ठाकरेदेखील खूप चिंतेत होते. तेदेखील भेटी देणं टाळतं होते. अशावेळी तुमचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेले. ही वेळ तुमच्या परिवारासाठी, राज ठाकरेंसाठी कशी होती? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला अमित ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. 

माझे आजारपण सुरु होते. आमचे 6 नगरसेवक पैसे देऊन पळवून नेलेत. त्यावेळी राज साहेबांना काय वाटतंय हे त्यांनी कधी दाखवलंदेखील नाही. ज्यांचा मुलगा आजारी आहे. अशावेळी ही घटना घडणं. त्या वेळचा मी विचारही करत नाही. त्यांच्यावर (राज ठाकरेंवर) तेव्हा काय वेळ आली असेल. वडिलांनी या गोष्टी कधी घरी आणल्या नाहीत. आनंदाचे क्षण ते घरी आणतात. वडील म्हणून ते तसेच आहेत, असे अमित ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. टीका करताना मर्यादा पाळतो. आमच्यावर संस्कार वेगळे आहेत. 20 वर्षांत कधी अशी टीका केली का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना विचारलाय. दरम्यान, 2 पैसे सुटत नाहीत त्यांच्या बॅगेत काय सापडणार? बॅगमध्ये हातरुमाल आणि कोमट पाण्याची बाटली असेल. बॅग तपासणीचं अवडंबर कशाला? असा खोचक टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय.