मुंबई : पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही दिवसांपासून वाढत आहेत. सोबतचं घरगुती गॅस सिलिंडरचा भावही वाढतो आहे. मागील काही दिवसांचा विचार केला तर फेब्रुवारी महिन्यात तब्बल तीन वेळा गॅसच्या किमती वाढल्या तर मार्च महिन्यात 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी वाढली. तसेच महिन्याच्या सुरुवातीला गॅसची किंमत 25 रुपयांनी वाढवली गेली. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये तब्बल 125 रुपयांनी वाढ झाली.
पण येत्या एप्रिल महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत दिलासा देणारी बातमी कळू शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलबरोबरच एलपीजी गॅसचे दरही कमी होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किमतीत बदल बघायला मिळतो. म्हणून उद्या म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीतला बदल होणार आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडल्याने गृहिणीं ही महागाईच्या संकटाचा सामना करतांना दिसल्या. गेल्या काही महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर अव्वाच्या सव्वा वाढलेत. परंतु येत्या महिन्यात जर खरंच घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत घसरण बघायला मिळाल्यास ही सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे.