मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, राज्याचेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजप राज्यात तब्बल एक हजार प्रचारसभा घेणार आहे. राज्यात ४८ मतदारसंघांत भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका उडवून देणार आहे. राज्यात ४ टप्प्यात मतदान होतंय. वर्ध्यात पंतप्रधान मोदी १ एप्रिलला आपली पहिली सभा करणार आहेत. पंतप्रधान राज्यात तब्बल ८ रॅली करणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तब्बल ७५ सभांना संबोधित करणार आहेत. केंद्रातले भाजपचे जवळपास सर्व महत्त्वाचे नेते राज्यात सभांचा धडाका उडवून देणार आहेत.
मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा १ एप्रिल रोजी वर्धा येथे सकाळी होणार असून त्याशिवाय अन्य लोकसभा क्षेत्रातही भाजपा-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी ते सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तारखेला कोल्हापूरात प्रचाराला सुरूवात केली असून त्यांच्याही ७५ पेक्षाही अधिक सभा या राज्यात होतील.राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आगामी काळात महाराष्ट्रात प्रचाराला येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील प्रचारसभामध्ये सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असूनही ते महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघात सभा घेणार आहेत.
त्याशिवाय चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे यांच्याही सभा महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणार आहेत. या नेत्यांशिवाय राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी, योगी आदित्यनाथ, सैय्यद शाहनवाज हुसेन, मुख्यात अब्बास नकवी, रमणसिंग, केशव प्रसाद मोर्य हे नेतेही राज्यातील भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. या राष्ट्रीय नेत्यांसोबत राज्यातील अन्य नेत्यांच्या सभाही महाराष्ट्रात होणार आहेत. गिरीश महाजन, गिरीश बापट, अतुल भातखळकर, आशिष शेलार, माधव भांडारी, कांताताई नलावडे हे प्रचार सभा घेणार आहेत.