Loksabha Election : भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार; आता कसं असेल जागावाटपाचं गणित?

Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी; भाजपच्या भूमिकेमुळं नेमकं काय बदलणार? पाहा जागावाटपासंदर्भातली मोठी बातमी   

सायली पाटील | Updated: Mar 12, 2024, 08:29 AM IST
Loksabha Election : भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार; आता कसं असेल जागावाटपाचं गणित?  title=
loksabha election 2024 bjp to give more seats to shivsena know latest updates

Loksabha Election : लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच आता सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जागावाटपावरून राजकारण रंगताना दिसत आहे. त्यातच महायुतीतील लोकसभा जागावाटपाबाबत सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. भाजप शिवसेनेला लोकसभेच्या सर्वाधिक जागा सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंना लोकसभेच्या 12 जागा देण्याची भाजपची तयारी असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. 

शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता 18 पैकी 13 खासदार आहेत. त्यामुळं विद्यमान सर्व जागा देण्यासाठी भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळत आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युतीत लढवलेल्या 22 जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दावा केला आहे. तेव्हा भाजपने देऊ केलेल्या जागांवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

फोनवर बोलताना तारतम्य बाळगा... 

राज्य मंत्रिमंडळात लोकसभा जागावटपावर चर्चा झाली असून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, धीर धरा असं सांगण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय. शिवाय बाहेर कुणीही जागावाटपावर चर्चा करू नये, फोनवर बोलताना, समाजमाध्यमांवर तारतम्य बाळगण्याच्या सूचना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्याचं समजतंय. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election : 'बारामती पवारांचा सातबारा नाही'; कोणाच्या वक्तव्यामुळं माजली खळबळ? 

दरम्यान, रायगड जागेवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. दुसरीकडे तटकरेंबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा भाजपचा अंदाज असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनिल तटकरेंऐवजी भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी द्यावी, असं भाजपचा सर्वे सांगतो. 

घराणेशाही नको 

मविआच्या घटकपक्षातील प्रस्थापित नेत्यांनी आपल्या मुला-मुलींना उमेदवारी देऊ नये अशी मागणी वंचितनं केली आहे. विशेष म्हणजे वंचित आणि मविआत आघाडीसाठी वाटाघाटी सुरु असताना वंचितनं घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन मविआला इशारा दिला. त्यामुळे आता नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषत: विदर्भातील जागांवरुन वंचित आक्रमक होताना दिसतेय. तेव्हा यावर नेमका काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

निवडणूक समितीची बैठक 

भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीनुसार पुढील दोन दिवसांमध्ये भाजप दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. तीन तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील काही जागांवरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, भारती पवार यांची नावं जाहीर होऊ शकण्याची शक्यता आहे.