आताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा

Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.  48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.

कपिल राऊत | Updated: Mar 12, 2024, 10:02 PM IST
आताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा title=

Loksabha 2024 Mahayuti : भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाची सखोल चर्चा झाली. या सर्व मतदारसंघात महायुतीचे कोण उमेदवार निवडून येऊ शकतात याबाबत रणनिती ठरवण्यात आली आहे. या चर्चेत महायुतीमधील (Mahayuti) प्रमुख पक्ष भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांना कोणते मतदारसंघ सोडायचे आणि त्यांचे उमेदवार देखील कोण असावेत यावरही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत भाजप सर्वाधिक 31 लोकसभा मतदार संघात लढण्यावर निर्णय झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.

शिंदे गटाला तेरा जागा
तर शिवसेना शिंदे गटाला 13 लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करता येणार आहेत. राष्ट्रवादी कॅाग्रेसला राज्यातील 4 लोकसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे करता येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या उमेदवारांची आणि मतदारसंघाची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांच्या बैठकीत मांडली होती. त्याच बरोबर त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा मान राखत त्यांना त्यांच्या 13 लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्दं दिला. 

भाजपने शिवसेनेला राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघ देताना त्यात एका जागेचा बदल केला आहे. तर एका मतदारसंघात उमेदवाराचा बदल केला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ भाजपने घेतला आहे. तर त्या बदल्यात शिवसेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ दिला आहे. तसंच कोल्हापूर लोकसभा मंतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या ऐवजी समरजीत घाटगे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणुक लढवतील. 

राष्ट्रवादी काँग्रेसकडे चार जागा
दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार यांच्या पक्षाला राज्यातील 4 लोकसभा मतदारसंघ देण्यात येणार आहे. बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी हे मतदारसंघ राष्ट्रवादी कॅाग्रेसला देण्यात येणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचे गजानन किर्तीकर आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे विधान परिषदेवर राजकिय पुर्नवसन करण्यात येणार आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदार संघातील प्रत्येक उमेदवारावर  भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत चर्चा झालीय. आता तीनही पक्षांचे जागावाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचीही माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.

उत्तर मुंबईत उमदेवार बदलणार
दरम्यान, उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजप केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी देणार अशी सूत्रांची माहिती आहे. उत्तर मुंबई मतदार संघात भाजपचे गोपाळ शेट्टी हे दोन टर्म खासदार आहेत. मात्र यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाणार असं बोललं जातंय. त्यांच्याऐवजी पियूष गोयल यांचं नाव भाजपकडून आघाडीवर आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात बिगर मराठी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो