राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवान घडामोडीही घडताना दिसतायत

अमर काणे | Updated: Apr 1, 2024, 06:43 PM IST
राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार, काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देणार?  title=

येश जगड, झी मीडिया : महाविकास आघाडीतून वंचित बहूजन आघाडीने (VBA) बाहेर पडत आपल्या उमेदवारांची घोषणा केलीय. जागावाटपाचं गुऱ्हाळ लांबल्याने प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मविआला (Mahavikas Aghadi) सोडचिठ्ठी दिली. तरीही वंचित बहूजन आघाडीने काँग्रेसला दोन जागांवर पाठिंबा दिलाय. यात नागपूर आणि कोल्हापूरचा समावेश आहे. नागपूरमध्ये भाजपने नितीन गडकरींना (Nitin Gadkari) तिकीट दिलंय. तर गडकरींविरोधात काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे रिंगणात उभे आहेत. कोल्हापुरातून महाविकास आघाडीने काँग्रेसच्या चिन्हावर छत्रपती शाहू महाराज यांना तिकीट दिलंय. तर शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार संजय मंडलिकांना उमेदवारी देण्यात आलीय. 

काँग्रेस वंचितला पाठिंबा देणार?
नागपूर आणि कोल्हापूर या दोन जागा सोडून काँग्रेसला (Congress) एकूण सात जागांवर पाठिंबा देण्याची तयारी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आलाय. प्रकाश आंबेडकर स्वत: अकोला लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत. अकोल्यात काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. मात्र अकोल्यात अभय पाटील यांना काँग्रेस तिकीट देणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अकोल्यात काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याबाबत विचार सुरु आहे. अकोल्यातली उमेदवारी काँग्रेस मागे घेईल असे संकेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनीही दिलेत..

मतं विभागणीचा फटका
वंचितला महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र त्यात मविआला अपयश आलं. प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत 20 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तरीही अकोल्यात 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसारखी परिस्थिती होऊ नये म्हणून काँग्रेसने उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर 2014 मध्ये भारिप बहुजन महासंघ पक्षाचे नेतृत्व करत होते. भाजप उमेदवार संजय धोत्रेंनी 4 लाख 56 हजार 472 मते घेत विजय संपादन केला. तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे हिदायत पटेल होते. त्यांनी 2 लाख 53 हजार 356 मते मिळवली. तर भारिपच्या प्रकाश आंबेडकरांना 2 लाख 38 हजार 776 मते मिळाली.. धोत्रेंचा विजय 2 लाख 3 हजार 116 मतांनी झाला होता. याचाच अर्थ आंबेडकर मुस्लिम उमेदवारामुळे पराभूत झाले होते.

2014 चीच पुनरावृत्ती 2019मध्येही झाली. भाजप उमेदवार संजय धोत्रे 5 लाख 54 हजार 444 मते मिळवत विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर असणा-या प्रकाश आंबेडकरांना 2 लाख 78 हजार 848 मते पडली. तर काँग्रेसच्याच हिदायत पटेल यांना 2 लाख 54 हजार 370 मते पडली. म्हणजे संजय धोत्रे हे  2 लाख 75 हजार 596 मतांनी विजयी झाले. यावेळीही काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये मतं विभागल्याने त्याचा फायदा भाजपला झाला..

2014 आणि 2019 मधली हीच चूक टाळण्याचे आता वंचित आणि काँग्रेसचे प्रयत्न आहेत. काँग्रेसने अकोल्यात उमेदवार उभा न केल्यास वंचित आणि भाजपमध्ये थेट लढत होऊ शकते.  ज्यामुळे भाजपला तगडी टक्कर मिळेल.